शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टीकोन ठेवावा : म्हस्के

By Admin | Updated: January 20, 2015 23:42 IST2015-01-20T21:46:10+5:302015-01-20T23:42:31+5:30

खानू येथे चर्चासत्र : चाऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या तंत्राचे प्रात्यक्षिक, शेतकऱ्यांनी घेतला लाभ

Farmers should have a professional perspective: Mhkke | शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टीकोन ठेवावा : म्हस्के

शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टीकोन ठेवावा : म्हस्के

रत्नागिरी : जर आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून पशुपालन केले, तर ते निश्चितच फायदेशीर ठरून रोजगाराभिमुख ठरेल. त्याकरिता फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जिद्द व चिकाटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसे केल्यास यश खात्रीचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांनी केले.
खानू (ता. रत्नागिरी) येथील श्री गांगेश्वर कामधेनू दत्तक ग्राम मंडळ, खानू - नाणीज व पशुवैद्यकीय दवाखाना, पाली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पशुसंवर्धन विषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पशुसंवर्धन, चिपळूण विभाग उपायुक्त डॉ. मिलिंद कुलकर्णी, पशुधन विकास अधिकारी डॉ. अभिजीत कसालकर, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, पंचायत समिती सदस्या दाक्षायिणी शिवगण, कामधेनू मंडळाचे अध्यक्ष सुनील चव्हाण, सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच गणपत सुवारे, प्रकाश गुरव उपस्थित होते.यावेळी डॉ. म्हस्के यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना सांगितले की, पशुपालक शेतकऱ्याला १ दिवसीय १०० कोंबडीची पिल्ले पुरविली जातात. त्यानंतर व्यवसायासाठी उपयुक्त असे ३ + १ बोकड वाटप केले जातात. या दोन्ही योजनांतून शेतकरी घरबसल्याही उत्तमपणे एक चांगला व्यवसाय करु शकतो.
योजनेंतर्गत जनावरांचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये गाई, म्हशी यांचे सहाचा गट करुन दिले जातात. यामध्ये संकरीत जातीचीही जनावरे उपलब्ध करुन दिली जातात. कुक्कुटपालन व्यवसायासाठी डी-फिदरिंग मशीनही अनुदानावर दिली जातात. या कार्यक्रमांतर्गत निकृष्ट चारा सकस करण्याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यामध्ये निकृष्ट, कमी प्रतीचे गवत, भात, नाचणी यांच्या पेंढ्यावर, काडावर युरिया, गुळ, मीठ यांच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाची फवारणी करुन ते नंतर वाळवून उत्तम प्रतीचा खाण्यायोग्य पौष्टीक चारा शेतकरी घराच्या घरीही तयार करु शकतो. तसेच ‘अझोला’चेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत पशुसंवर्धनसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन पालीचे डॉ. रवींद्र केसरकर, रत्नागिरीचे डॉ. दिलीप फणसेकर, डॉ. रमेश नलावडे, डॉ. राजन नलावडे, डॉ. पोतदार, महेश गोताड यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers should have a professional perspective: Mhkke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.