फॅन्सी दुनिया भोवली
By Admin | Updated: July 28, 2015 00:24 IST2015-07-27T22:02:28+5:302015-07-28T00:24:41+5:30
वाहतूक शाखेची कारवाई : बेशिस्तीला चाप लागणार

फॅन्सी दुनिया भोवली
रत्नागिरी : वाहनांच्या वाढत्या संख्येप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यात बेशिस्त वाहन चालकांची संख्याही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. अनेकजण आपल्या मोटारसायकलला पुढे व मागे वेगवेगळी फॅन्सी नंबर प्लेट लावून नियमांची पायमल्ली करीत आहेत. अशा बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी जानेवारी २०१५ ते जून २०१५ या कालावधीमध्ये जिल्ह्यात फक्त १६३ जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून वाहतूक शाखेने १७ हजार २०० रुपये दंड वसूल केला.फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणारे दुचाकीस्वार पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मात्र, त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई होताना दिसत नाही. वाहनाच्या बाबतीत नंबरप्लेट हा महत्त्वाचा भाग आहे. नंबर प्लेटसाठी चारचाकी, दुचाकी, मालवाहक अशा वेगवेगळ्या वाहनांना वेगवेगळ्या रंगाचे व मापाचे नियम आहेत.मात्र, या सर्व नियमांना पायदळी तुडवून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही बेशिस्त वाहनचालक दादा, भाई, आई, मराठा, नाव, आडनाव अशा अनेक प्रकारच्या शब्दामध्ये फॅन्सी नंबर बनवित आहेत. काही वाहनचालक चक्क पुढे व मागे वेगवेगळे नंबर टाकून मोठ्या ऐटीत आपली वाहने मिरवत आहेत.
अशा प्रकारे फॅन्सी नंबरप्लेट वाहनाला लावल्याने एखादा अपघात झाल्यावर अशा वाहनांची माहिती मिळणे अवघड बनते. जिल्ह्यात फिरणाऱ्या फॅन्सी नंबरप्लेट वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
याबाबतीत केवळ वाहन चालकांवरच नव्हे; तर अशा नंबर प्लेट बनवून देणाऱ्यांवरही कारवाई करणे आवश्यक आहे. अशा कारवाईमुळे कायद्याचे उल्लंघन होणाऱ्या घटनांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. फॅन्सी नंबरप्लेट वाहन चालकांनी लक्ष वेधून घेतल्याने पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)