पानसरे कुटुंबीयांसाठीही आता वकिलांची फौज
By Admin | Updated: September 26, 2015 00:21 IST2015-09-26T00:11:37+5:302015-09-26T00:21:55+5:30
सांगलीतून सुरुवात : सनातन संस्थेला आव्हान

पानसरे कुटुंबीयांसाठीही आता वकिलांची फौज
सांगली : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाड याचे वकीलपत्र घेण्यासाठी हिंदू विधिज्ञ परिषदेने वकिलांची फौज उभी केली आहे, तशीच फौज पानसरेंच्या कुटुंबीयांचे वकीलपत्र घेण्यासाठी व सरकार पक्षाला सहाय्य करण्यासाठी उभी करण्यास शुक्रवारी सांगलीतून सुरुवात झाली. यासाठी
अॅड. के. डी. शिंदे, अॅड. अजित सूर्यवंशी, अॅड. अमित शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. सांगलीतून तब्बल शंभर वकिलांनी वकीलपत्र घेतल्याची कागदपत्रे सही करून अॅड. शिंदे यांच्याकडे दिली आहेत. राज्यातूनही शेकडो वकील पानसरेंचे वकीलपत्र घेण्यासाठी पुढे आले आहेत.
गेल्या आठवड्यात कोल्हापूर पोलिसांनी सनातन संस्थेचा साधक असलेल्या समीरला सांगलीतून अटक केली होती. पानसरेंची हत्या झाल्यानंतर मारेकऱ्यांचे वकीलपत्र कोणीही घ्यायचे नाही, असा निर्णय वकील संघटनेच्या वरिष्ठ स्तरावरून झाला होता. पानसरेंची हत्या झाल्यानंतर पुरोगामी संघटनांसह समाजातील तळागाळातील प्रत्येक व्यक्ती हळहळली होती. पानसरेंचे सांगलीशी दृढ नाते होते. नव्या पिढीला राजर्षी शाहूंचा परिचय व्हावा, यासाठी त्यांनी शंभर व्याख्याने देण्याचा संकल्प केला होता. यातील अनेक व्याख्याने त्यांनी सांगलीत दिली होती. त्यांचा मारेकरीही सांगलीतला निघाला. त्यामुळे पुरोगामी संघटनांनी पानसरे यांचे कुटुंब व सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला.
सांगलीतून दोन माजी जिल्हा सरकारी वकील वसंतराव मोहिते, अशोकराव वाघमोडे यांच्यासह फौजदारी खटले चालविण्यात हातखंडा असलेले अॅड. जयसिंग पाटील, श्रीकांत जाधव, गिरीश तपकीरे, वसंत शिंदे, पी. टी. जाधव, उत्तमराव निकम, के. डी. शिंदे, श्याम जाधव, आर. बी. कोकाटे, दीपक शिंदे, चंद्रकांत माळी, उच्च न्यायालयातील कुलदीप निकम यांच्यासह शंभर वकिलांनी पानसरे कुटुंब व सरकार पक्षाच्या बाजूने वकीलपत्र घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी वकीलपत्र घेतले असल्याची कागदपत्रे सह्या करून अॅड. अमित शिंदे यांच्याकडे दिली आहे. जमा झालेली वकीलपत्रे घेऊन शिंदे सायंकाळी कोल्हापूरला रवाना झाले. सांगलीसह राज्यातील सर्व वकील संघटनांशी त्यांनी संपर्क साधून वकीलपत्र घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
दोन दिवसांपूर्वी समीरच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून घेण्यासाठी त्यास पुन्हा न्यायालयात उभे केले होते. त्यावेळी समीरच्या बाजूने ‘सनातन’ने ३१ वकिलांची फौज न्यायालयात उभी केली होती. सनातनला आव्हान देण्यासाठी सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, यवतमाळ, नागपूर, अकोला या जिल्ह्यातील वकिलांनी अॅड. शिंदे यांच्याशी संपर्क साधून, पानसरे कुटुंब व शासनातर्फे वकीलपत्र घेणार असल्याची ग्वाही दिली आहे. वकीलपत्र घेतल्याची कागदपत्रे सह्या करून येत्या एक-दोन दिवसात देणार असल्याचे या वकिलांनी सांगितले आहे.
किमान तीनशेहून अधिक वकील वकीलपत्र घेतील, असा अंदाज अॅड. शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, शुक्रवारी सुट्टी असूनही वकील एकमेकांशी संपर्क साधत होते. नुसते वकीलपत्र घेऊन थांबणार नाही, तर पानसरेंच्या मारेकऱ्यांना शिक्षेसाठी प्रयत्न केले जातील. (प्रतिनिधी)
प्रकाश आंबेडकरही सहभागी
भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही शुक्रवारी सांगलीत आल्यानंतर वकीलपत्रावर सही करून ते अॅड. शिंंदे यांच्याकडे दिले. त्यांच्यासोबत अनेक तरुण वकिलांनीही वकीलपत्रावर सह्या केल्या.
समीरचे वकीलपत्र घेणाऱ्यांमध्ये काही वकील ‘आरएसएस’चे कार्यकर्ते आहेत. कोणी काय करावे, याला आमचा विरोध नाही. आम्हाला त्यांच्यावर टीका करण्याची गरज वाटत नाही. पण, आम्हीही पूर्ण ताकदीनिशी पानसरे यांची बाजू मांडू.
- अॅड. अमित शिंदे, सांगली