वाळू व्यवसायाला मच्छीमारांचा विरोध

By Admin | Updated: July 6, 2015 00:25 IST2015-07-05T21:44:31+5:302015-07-06T00:25:14+5:30

दापोली तालुका : खाडीपुलाजवळ वाळू उत्खनन नको

False conflicts with the sand profession | वाळू व्यवसायाला मच्छीमारांचा विरोध

वाळू व्यवसायाला मच्छीमारांचा विरोध

आंजर्ले : आंजर्ले (ता. दापोली) खाडीपुलाला लागून असलेल्या जागेत व्यवसायासाठी कोणालाही परवानगी देऊ नये, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.आंजर्ले खाडी पुलामुळे आंजर्ले ते केळशी परिसर तालुक्याला जोडला गेला आहे. हा पूल सागरी महामार्गाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या पुलामुळे खऱ्या अर्थाने आंजर्ले ते केळशी परिसरातील गावांच्या विकासाला सुरूवात झाली आहे. तीन वर्षांपूर्वी आंजर्ले खाडीत वाळू उत्खननाला परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी अडखळ उर्दू शाळेजवळ पुलाला लागून असलेल्या जागेत काहींनी वाळू व्यवसाय सुरू केला होता. यावरून वादंग उठला होता. मच्छिमार व काही जागरूक नागरिकांनी यावर आक्षेप घेतला होता. मात्र, त्यानंतर न्यायालयाच्या बंदीमुळे शासनाकडून वाळू उत्खननास परवानगी देण्याचे थांबविण्यात आले. वाळू उत्खननासाठी शासनाकडून अधिकृत परवानगी दिली जाणार आहे. शासनाकडून अधिकृत परवानगी मिळणार असल्याने काही वाळू व्यावसायिक पुलाला लागून असलेल्या जागेत वाळू उत्खनन करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे पुलाला धोका निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत पुलाच्या दोन्ही बाजूंना लागून मच्छीमारांनी आपल्या नौका शाकारून ठेवल्या आहेत. गेली काही वर्षे या मच्छीमारी नौका पावसाळ्यात पुलाजवळ शाकारून ठेवल्या जातात.
अडखळ उर्दू शाळेसमोरील जागेत काही वाळू व्यावसायिक पुन्हा वाळू व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. आंजर्ले खाडी पुलाला लागूनच ही जागा आहे. येथे वाळू उत्खनन करण्यास परवानगी दिल्यास खाडी पुलाला धोका निर्माण होणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात नौका शाकारून ठेवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत आंजर्ले खाडीपुलाला लागून असलेल्या जागेत वाळूसाठा करायला किंवा वाळू उत्खनन करायला प्रशासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे. ग्रामस्थ व मच्छीमारांचा विरोध विचारात न घेता प्रशासनाने पुलाजवळच वाळूसाठा किंवा वाळू उत्खनन करायला परवानगी दिली, तर संघर्ष पेटणार आहे. ‘लोकमत’ने तहसीलदार कल्पना गोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, ज्यावेळी वाळू उत्खननाला परवानगी देण्याबाबत अहवाल मागवला जाईल, त्यावेळी आम्ही पाहणी करणार आहोत. कोणत्याही स्थितीत आम्ही पुलाला धोका पोहोचू देणार नाही. कारण हा पूल दापोली तालुक्यातील दळणवळणाचे मुख्य भाग आहे. या पुलामुळे आंजर्लेपासून बाणकोटपर्यंतचा परिसर जोडला गेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)

Web Title: False conflicts with the sand profession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.