पालकमंत्र्यांवर आरोपांच्या फैरी
By Admin | Updated: May 14, 2014 00:21 IST2014-05-14T00:20:52+5:302014-05-14T00:21:11+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेने दीड वर्षांपूर्वी केलेल्या शहर विकास आराखड्यानुसारच पालिकेला विविध विकासकामांसाठी शासनाकडून पैसे मिळणार आहेत.

पालकमंत्र्यांवर आरोपांच्या फैरी
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेने दीड वर्षांपूर्वी केलेल्या शहर विकास आराखड्यानुसारच पालिकेला विविध विकासकामांसाठी शासनाकडून पैसे मिळणार आहेत. मात्र, प्रत्येक पैसा मीच देतोय, अशा थाटात श्रेय लाटण्याची राज्यमंत्री उदय सामंत यांची भूमिका चुकीची आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यमंत्री सामंत, आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन व नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी रंजना गगे हे संगनमताने कारभार करीत आहेत, असा घणाघाती आरोप माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक मिलिंद कीर व महायुतीच्या अन्य नगरसेवकांनी केला. या विषयावरून पालिका सभेत खडाजंगी झाली. रत्नागिरी पालिकेची सर्वसाधारण सभा आज (मंगळवार) नगराध्यक्ष अशोक मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अपेक्षेप्रमाणे रत्नागिरीतील २१ कोटींच्या डांबरीकरण भूमिपूजनाचा विषय सभेत गाजला. कारभाराबाबत वारंवार चुका करणार्या व राज्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार्या मुख्याधिकारी गगे यांच्यावर कारवाईची मागणी याआधीच झाली आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी कीर यांनी केली. रत्नागिरीत साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज व मारुती मंदिर ते नाचणे गावदेवी मंदिर या ११ कोटी खर्चाच्या दोन रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या अल्प मुदतीच्या निविदा काढल्या गेल्या. याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला ११ मे रोजी कोणीच आले नाही. त्यामुळे पालिकेच्या कर्मचार्यांना सायंकाळी ५ वाजण्याच्या कार्यक्रमाला आदेश काढून बोलावून नेले. नियमानुसार निविदा नसल्याने या प्रक्रियेला जिल्हाधिकार्यांनी स्थगिती देऊन कालच्या सुनावणीत नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत. सभागृहात महायुतीच्या नेत्यांना या विषयावरून रोखण्याचा राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्तात्रय साळवी, स्मितल पावसकर यांनी प्रयत्न केला. मात्र, नुसते रस्ते केले म्हणजे विकास नव्हे, असे भैया मलुष्टे यांनी खडसावले. पालकमंत्र्यांना रस्ते करून वडिलांची कंपनी चालवायची आहे, असा शेरा प्रदीप साळवी यांनी मारल्यानंतर महायुतीच्या सर्वच सदस्यांनी बाके वाजवून दाद दिली. (प्रतिनिधी)