फाटली जाळी अन खिसाही!
By Admin | Updated: January 14, 2015 00:41 IST2015-01-14T00:04:08+5:302015-01-14T00:41:29+5:30
वाऱ्यामुळे मासे किनाऱ्यावर : गाळाने मच्छिमारांचा घास हिरावला...

फाटली जाळी अन खिसाही!
मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे थंडीचा कडाका वाढतो आहे. याच कालावधीत मासे किनाऱ्यालगत येतात. परंतु सागरी किनारे गाळाने भरलेले असल्याने, त्यात जाळी फाटून नौका मालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. जाळ्यांच्या किमती लाखांमध्ये असल्याने संबंधित मच्छिमारांचे नुकसान होत आहे. या जाळ्यांबरोबरच खिशालाही चाट बसत आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला १५७ किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. किनारपट्टीवरील १०४ गावांतील १४ हजार ८१६ कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारीअखेर वारे उत्तरेकडून वाहत असल्याने, वाऱ्याला वेग अधिक असतो. शिवाय समुद्रातील लाटांनाही विशिष्ट प्रकारचा करंट असतो. त्यामुळे मासे किनाऱ्यालगत येतात. परंतु किनाऱ्यावरील गाळ उपसा होत नसल्यामुळे, जाळी चिखलात अडकून फाटतात. जाळ्यांच्या किमती ७ ते २५ लाखांच्या आसपास आहेत. एक जाळे फाटले, तर दुरूस्तीकरिता चार ते पाच दिवस सहज जातात. परंतु त्याकरिता २० ते २५ कारागिर जाळी दुरूस्तीकरिता बसवावे लागतात. जाळी विणणाऱ्या कारागिरांची दिवसाची मजुरी ४०० रूपये आहे. कारागिरांची मजुरीच दिवसाला ८ ते १० हजार इतकी होते. त्यामुळे जाळी दुरूस्तीकरिता किमान ४० ते ५० हजार रूपये खर्च सहज येतो. मात्र, त्या मानाने मासे मिळत नसल्याने, मच्छिमारांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. आधीच वातावरणात कायम बदल होत असल्याने, मच्छिमारीवर परिणाम होत असताना आता ही नवीन समस्या भेडसावू लागली आहे.
वाऱ्याच्या वेगामुळे खोल समुद्रात नौका घालण्यास मच्छिमार धजावत नाहीत. शिवाय माशांचे उत्पादन या काळात कमी असल्याने खलाशी पगार, इंधनखर्च, देखभाल दुरूस्ती खर्च, बर्फ यामुळे मच्छिमारांचा खर्च वसूल होत नाही. शिवाय जाळी फाटल्यामुळे मच्छिमारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
- शब्बीर होडेकर,
उपाध्यक्ष मिरकरवाडा आदर्श मच्छिमार सहकारी सोसायटी.
उत्पादन मेट्रीक टनमध्ये
वर्षउत्पन्न
२००५-०६१,०५,०६९
२००६-०७१,०९,०५५
२००७-०८८५,०९९
२००८-०९७२,१२२
२००९-१०७५,१२२
२०१०-११९५,९५०
२०११-१२८८,४३८
२०१२-१३ ८७,६९०
२०१३-१४१,०६,६५२