वेहेळेमधील सुपुत्राच्या मदतीने गहिवरले सातारकरांचे चेहरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:19+5:302021-05-11T04:33:19+5:30
अडरे : कोरोनाच्या काळात हातावरचे पोट असणारे, मजुरांची हाेणारी उपासमार लक्षात घेऊन चिपळूण तालुक्यातील वेहेळे गावचे सुपुत्र तथा ...

वेहेळेमधील सुपुत्राच्या मदतीने गहिवरले सातारकरांचे चेहरे
अडरे : कोरोनाच्या काळात हातावरचे पोट असणारे, मजुरांची हाेणारी उपासमार लक्षात घेऊन चिपळूण तालुक्यातील वेहेळे गावचे सुपुत्र तथा साताऱ्याचे विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के व त्यांचे चिरंजीव शंभू धावून गेले. कोरोनाची कोणतीच भीती न बाळगता गरजूंच्या घरोघरी जाऊन त्यांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप केले. राजेशिर्के कुटुंबियांनी दाखविलेल्या या माणुसकीमुळे अनेकांना गहिवरून आले, तर अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले.
सुहास राजेशिर्के यांनी माणुसकीच्या भावनेतून त्यांच्याकडे पाहिले. केवळ पाहिलेच नाही, तर त्यांच्या घरी जाऊन त्यांची आपलेपणाने विचारपूस करून त्यांना आर्थिक स्वरूपाची मदतही केली. शंभू यांनीही सॅनिटायझरपासून ते साबणापर्यंत आणि तांदळापासून ते गहू ज्वारीपर्यंत अनेक जीवनावश्यक वस्तू नेऊन दिल्या. रस्त्यावर चपला शिवायला बसलेले, घंटा गाडीवर काम करणारे, शहरातील झाडलोट करणारे सफाई कर्मचारी यांच्याशी संपर्क करून मदतीच्या माध्यमातून त्यांना दिलासा दिला. पोवई नाका, समर्थ मंदिर, जकातवाडी कचरा डेपो, माहुलीची कैलाश स्मशानभूमी येथील लोकांचे अश्रू पुसण्याचेच काम त्यांनी केले़
--------------------------
संकटकाळात लोकांना मदत केली पाहिजे. संकटग्रस्तांचे जगणे सुसह्य करण्यासाठी आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी मदतही केली पाहिजे. कारण कोरोनाने जी परिस्थिती निर्माण केलीय ती कधी निवळेल हे अस्पष्ट आहे. अशावेळी गरिबांना कोण आधार देणार. मी जी मदत केलीय वा करतोय ते काही फार मोठे काम किंवा उपकार करतोय असे अजिबात नाही. माणूस म्हणून माणसाला मदत करणं हा साधा माणुसकीचा सिद्धांत आहे, तो आपण जपला पाहिजे.
- सुहास राजेशिर्के