परीक्षा आवेदनपत्रासाठी मुदतवाढ

By Admin | Updated: November 5, 2015 23:58 IST2015-11-05T23:18:53+5:302015-11-05T23:58:42+5:30

माध्यमिक शालांत : आॅनलाईन पद्धतीने स्वीकारणार

Extension for the examination application form | परीक्षा आवेदनपत्रासाठी मुदतवाढ

परीक्षा आवेदनपत्रासाठी मुदतवाढ

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेतर्फे मार्च २०१६मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
नियमित बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी प्रमाणपत्र, प्राप्त झालेले पूर्वीचे खासगी विद्यार्थी व श्रेणी सुधार योजनेंतर्गत बसणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दि. १९ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता परीक्षा शुल्काअभावी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याकरिता २६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली
आहे.
दुष्काळी भागातील विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नयेत, यासाठी परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे. याबाबतची सूचना सर्व विभागीय मंडळांना व अन्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
नियमित शुल्कासह माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे १९ नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्र आॅनलाईन जमा करावीत. विलंब शुल्कासह २६ नोव्हेंबरपर्यंत जमा करण्याचे आवाहन केले आहे. माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरण्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या नियमित शुल्कासह २३ नोव्हेंबर, तर विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत भरण्याचे आवाहन केले आहे. दि. १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्यांची एक्सेलमध्ये प्रिंट काढावी, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)

परीक्षेची आवेदनपत्र आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेकडे संपर्क साधावा. आॅनलाईन आवेदनपत्र भरताना येणाऱ्या अडचणींबाबत मुख्याध्यापकांनी संबंधीत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.खासगी विद्यार्थी म्हणून पात्र होण्यासाठी नावनोंदणी फॉर्म नं. १७ ज्या विद्यार्थ्यांनी भरले आहेत, त्यांच्या परीक्षेची आवेदनपत्र भरण्याच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक उपलब्ध असतील, अशा विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रात आधार क्रमांक भरण्यात यावा. हा क्रमांक नसल्यास भरणे बंधनकारक नाही, असेही मंडळाने कळवले आहे.

Web Title: Extension for the examination application form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.