जैतापूरबाबत भूमिका स्पष्ट करावी
By Admin | Updated: July 27, 2014 00:49 IST2014-07-27T00:49:24+5:302014-07-27T00:49:56+5:30
नीलेश राणे यांचा इशारा : शिवसेनेकडून नागरिकांची फसवणूक

जैतापूरबाबत भूमिका स्पष्ट करावी
रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि इकोसेन्सिटिव्ह झोन या प्रमुख मुद्द्यांबाबत लोकांना भूलथापा देऊन शिवसेनेने मते मिळविली; पण आता या दोन्ही मुद्द्यांबाबत आपली नेमकी भूमिका काय आहे, हे दहा दिवसांच्या आत शिवसेनेने स्पष्ट करावे, अन्यथा यावर मला उत्तर द्यावे लागेल, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
शहरातील त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझील येथे गेले असता त्यांनी तिथेही जैतापूर प्रकल्प होणार, असा शब्द दिला. परत मुंबई आल्यावरही त्यांनी भाभा संशोधन केंद्रालाही असाच शब्द दिला. म्हणजे कोकणात शिवसेनेने ज्या मुद्द्यावर लोकांची मते मिळविली, त्याबाबत आता पक्षाची आणि त्यांच्या खासदारांचीच नेमकी भूमिका काय, हे येत्या दहा दिवसांत स्पष्ट करावे. केवळ शाब्दिक विरोध दाखवून उपयोग नाही. आता लोकांपुढे जाऊन त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल, असे ते म्हणाले.
इकोसेन्सिटिव्ह झोनबाबत ते म्हणाले की, अंदाजपत्रक जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच सभागृहात ‘इन्व्हायरल फॉरेस्ट’वर चर्चा झाली. यावेळी केरळमधील खासदारांनी इकोसेन्सिटिव्हला विरोध दर्शविला. मग आपल्या कोकणच्या विद्यमान खासदारांनी विरोध का दर्शविला नाही? या दोन प्रमुख मुद्द्यांबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका आता त्यांनी स्पष्ट करावी, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
खासदार विनायक राऊत यांना कोकण रेल्वे बोर्ड आणि रेल्वे बोर्ड यांच्यातील फरकच कळलेला नाही. याच चर्चेवेळी या विद्यमान खासदारांनी हे दोन्ही बोर्ड एकत्र यावेत, असा मुद्दा मांडला. हे दोन बोर्ड एकत्र केले तर कोकणला काय मिळेल, हे सांगायलाच नको, अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली.
केवळ आमच्यावर टीका करण्यापलीकडे राऊत यांना लोकांच्या कामाशी देणेघेणे नाही. म्हणूनच ज्या मुद्द्यावर त्यांना लोकांनी निवडून दिले, त्या मुद्द्यांबाबत त्यांनी आपली भूमिका मांडावी, अन्यथा ते मुद्दे घेऊन आपण येत्या विधानसभा निवडणुकीत लोकांसमोर जाऊ, असा इशारा त्यांनी दिला.
असे काही होणार नाही...
नारायण राणे यांचे समर्थक सुभाष बने, गणपत कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राजकीय चित्र बदलतंय का? या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी ‘असे काही होईल, असे वाटत नाही,’ असे मत व्यक्त केले. तसेच नारायण राणे यांना केसरकर आणि उपरकर हे प्रतिस्पर्धी निर्माण झाले आहेत का, या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यांना मीडियानेच मोठे केले आहे. त्यांच्यात काही ताकद आहे, असे वाटत नाही. (प्रतिनिधी)