सर्वसामान्यांना शिक्षण महाग डोनेशन १00 टक्क्यांनी वाढले : शालेय वस्तू दहा टक्क्यांनी वधारल्या
By Admin | Updated: May 11, 2014 00:04 IST2014-05-11T00:04:27+5:302014-05-11T00:04:27+5:30
रत्नागिरी : इतर क्षेत्रात होणार्या महागाईची झळ शिक्षण क्षेत्रालाही चांगलीच बसणार असून, यावर्षी रत्नागिरीतील नामांकित शिक्षण संस्थांकडून इमारत

सर्वसामान्यांना शिक्षण महाग डोनेशन १00 टक्क्यांनी वाढले : शालेय वस्तू दहा टक्क्यांनी वधारल्या
रत्नागिरी : इतर क्षेत्रात होणार्या महागाईची झळ शिक्षण क्षेत्रालाही चांगलीच बसणार असून, यावर्षी रत्नागिरीतील नामांकित शिक्षण संस्थांकडून इमारत निधी किंवा तत्सम कारणासाठी म्हणून घेतल्या जाणार्या डोनेशनमध्ये तब्बल १00 टक्के वाढ केली आहे. या धक्क्यापाठोपाठ पालकांना दुसरा धक्का बाजारपेठेने दिला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्याच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. रत्नागिरीत नर्सरीतील प्रवेशासाठी तब्बल २0 हजार रूपये डोनेशन मोजावे लागत आहे. त्यामुळे महाग होणारे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सर्वसामान्यांना खूपच महाग होणार असल्याचे चित्र दिसत आहे. साहित्याच्या किंमतीमध्ये थोडीफार वाढ होणार हे अपेक्षित असते. मात्र शाळांच्या डोनेशनमध्ये दणदणीत वाढ झाली आहे. न्यायालयाच्या आणि सरकारच्या आदेशामुळे त्याला डोनेशन असा शब्द न वापरता इमारत निधी किंवा तत्सम निधी म्हटले जाते. बहुतांश पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे अधिक आहे. त्यातही शहरातील नामवंत शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे नर्सरी किंवा ज्युनियर केजीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालक शाळांमध्ये खेटे मारत आहेत. गतवर्षापर्यंत आठ ते दहा हजार रूपये असलेली ही रक्कम यंदा २० ते २५ हजारावर गेली आहे. याशिवाय दरमहा आकारण्यात येणार्या शैक्षणिक शुल्कामध्येही वाढ करण्यात आली आहे. प्रवेश मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पालक याबाबत कोणताही आवाच उठवत नाहीत, हेही स्पष्टपणे दिसत आहे. मे च्या पहिल्या आठवड्यात निकाल लागल्यानंतर पालक शैक्षणिक साहित्य खरेदीस सुरूवात करतात. बहुतांश पालक शाळा सुरू होण्यापूर्वी खरेदीस प्रारंभ करतात. मात्र त्याच दरम्यान दुकानातून खचाखच गर्दी असते. त्यातच पुस्तके मिळत नसल्याने पालकांना सारख्या खेपा माराव्या लागतात. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वह्यांच्या किमंतीमध्ये १० टक्केने वाढ झाली आहे. ब्रॅण्डेड कंपन्यांच्या वह्यांना विशेष मागणी आहे. शंभर पानी मोठ्या आकारातील वह्या १९६ ते २२० रूपये डझन, लहान आकारातील वह्या १९० ते २१६ रूपये डझन, दोनशे पानी मोठ्या वह्या २४५ रू.डझन, लहान वह्या २७० रू. डझन दराने विकण्यात येत आहेत. कव्हर रोल ३५ ते ५० रू, पेन्सील बॉक्स ४५ ते ६८ रू, खोड रबर ३५ रूपये बॉक्स, कंपास ४० ते १३० रू, वॉटर बॉटल २० ते ६० रू, टिफीन बॉक्स ४० ते १५० रू, टिफीन बॅग ३५ ते ६० रू, स्कूल बॅग १५० ते ७५० रू दराने विकण्यात येत आहेत. याशिवाय गणवेश, रेनकोट, पावसाळी चप्पल किंवा बूट, छत्र्या याचाही खर्च वाढला आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. (प्रतिनिधी)