चार गावातील महिलांची कसरत
By Admin | Updated: April 15, 2015 23:57 IST2015-04-15T21:36:20+5:302015-04-15T23:57:46+5:30
भीषण पाणीटंचाई : संगमेश्वरमध्ये धावू लागला आणखी एक टँकर

चार गावातील महिलांची कसरत
फुणगूस : दिवसेंदिवस पाणीटंचाई उग्र रुप धारण करत असून, संगमेश्वर तालुक्यातील टंचाईग्रस्त चार गावे व चालर वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाचांबे गावातील जखीण देव वाडीलाही आता पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे. सध्या असलेला एक टँकर तालुक्याला अपुरा पडत असल्याने प्रशासनाकडून आणखी एका टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईला सुरूवात झाली होती. मात्र आता तर पाणीटंचाईने आणखी थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. तालुक्यातील चार गावातील चार वाड्यांना ही पाणीटंचाई जाणवत असली तरी या चारही गावातील चार वाड्यांमध्ये असलेली परिस्थिती भीषण असल्याचे दिसून येते. शासकीय टँकर ज्यावेळी पाणी घेऊन येतो, त्यावेळी पिण्यापुरते पाणी मिळेल की नाही, याचीही शाश्वती नसते, एवढी झुंबड या टँकरभोवती उडते. त्यामुळे पिण्यापुरते पाणी मिळवतानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. एका वाडीला लागेल एवढेही पुरेसे पाणी मिळत नसताना ग्रामस्थांची विशेष करून महिलांची मोठी कुचंबणा होत असल्याचे दिसून येते.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दि. २ एप्रिलपासूनच संगमेश्वर तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील पाचांबे (नेरदवाडी), धामापूरतर्फ देवरुख (चव्हाणवाडी), फुणगूस (घडशेवाडी), बेलारी (माचीवाडी) या वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.
आता पाचांबे जखीणदेव वाडीलाही पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांच्याकडून टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या प्रशासनाकडे सादर केलेल्या अर्जाची दखल घेत तहसील तसेच पंचायत समितीने येथे संयुक्त पाहणी करुन टँकर सुरु करण्याचा निर्णय घेतला.
तालुक्यातील टँकरची मागणी पाहता एका टँकरवर ताण पडत आहे. याची दखल संगमेश्वर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी घेतली असून, संगमेश्वर तालुक्यासाठी आणखी एका टँकरची व्यवस्था करुन दिल्याने टंचाईग्रस्त वाड्यांना काहीअंशी दिलासा मिळत आहे. (वार्ताहर)
घसा कोरडा
टँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा.
पाचांबे जखीणदेव वाडीलाही पोहोचली पाणीटंचाईची झळ.
एक टँकर अपुरा पडत असल्याने प्रशासनाकडून आणखी एका टॅकरची व्यवस्था.
२ एप्रिलपासूनच संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईला सुरूवात.
टँकरभोवती उडतेय महिलांची झुंबड.