सगळ्यांचाच स्वबळाचा नारा
By Admin | Updated: October 8, 2015 00:28 IST2015-10-07T23:40:26+5:302015-10-08T00:28:22+5:30
रत्नागिरी पालिका : शेट्येंचे आव्हान मोडीत काढण्यास सेनेचे बंड्या साळवी मैदानात--रणसंग्राम

सगळ्यांचाच स्वबळाचा नारा
प्रकाश वराडकर ---रत्नागिरी नगरपालिका पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी ‘स्वबळाचा’ नारा दिला आहे. त्यामुळे मतांचे विभाजन अटळ असून, त्याचा फटका सेना व भाजप या दोन्ही पक्षांना बसणार आहे. उमेश शेट्येंच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस शहरात बळकट झाली असून, अपात्रतेच्या फेऱ्यात गमावलेल्या चारही जागा पुन्हा काबीज करण्याचा चंग राष्ट्रवादी कॉँग्रेसने बांधला आहे. तर राष्ट्रवादीचे आव्हान मोडीत काढण्यासाठी तालुकाप्रमुख बंड्या साळवी मैदानात उतरले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात काहीशी थंडगार पडलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस पालिका पोटनिवडणुकीतील राजकीय घडामोडींनंतर अचानकपणे कार्यरत झाली आहे. आता पक्षाला पुन्हा पूर्वीचे दिवस येतील, अशी प्रतिक्रीयाही राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केली. बुधवारी उमेश शेट्ये यांच्यासह राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद ऊकार्डे व सहाय्यक निवडणूक अधिकारी मारुती खोडके यांच्याकडे दाखल केले.
काही काळापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले उमेश शेट्ये यांची शिवसेना पक्षात कायमच कोंडी झाल्याची भावना झाल्यानेच शेट्ये यांनी स्वगृही परतण्याचे तटकरे व अन्य नेत्यांचे निमंत्रण स्वीकारले. त्याप्रमाणे घडामोडी घडल्या असून, तालुक्यात शेट्येंच्या रुपाने राष्ट्रवादीला धडाडीचे नेतृत्व मिळाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत या चारही जागा जिंकण्यासाठी शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील पक्ष कार्यकर्तेही कामाला लागले आहेत.
एकीकडे उमेश शेट्येंनी आव्हान निर्माण केलेले असतानाच गेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचा रत्नागिरीचा गड सांभाळण्यात महत्वाची भूमिका असलेले तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी शिवसेनाच चारही जागा जिंकणार असे सांगत राष्ट्रवादीचे उमेश शेट्ये यांचे आव्हान स्विकारल्याचेच अप्रत्यक्षरित्या सुचित केले आहे. त्यामुळे या चारही जागा जिंकण्यासाठी शिवसेना इंच इंच लढणार असल्याचे चित्र आहे. मात्र वन टू का फोर करण्यात माहीर असलेले उमेश शेट्ये आता या चार जागा जिंकण्यासाठी काय राजकीय डावपेच खेळतात, पुन्हा एकदा ते शहरात व तालुक्यात आपला गड शाबुत करणार काय, याबाबत शहरवासियांनाही उत्कंठा आहे. एकुणच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. (प्रतिनिधी)
विरोधकांत चर्चा : शेट्येंचे शक्तीप्रदर्शन
राष्ट्रवादीत अर्थात स्वगृही परतलेले उमेश शेट्ये यांनी मंगळवारी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता. त्यांनी बुधवारी दुपारी पालिकेच्या संत गाडगेबाबा सभागृहात आपला उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून भरला. अन्य उमेदवारांचे अर्जही भरण्यात आले. शेट्ये यांनी अर्ज भरताना मोठे शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे त्यांच्या विरोधकांमध्ये तो चर्चेचा विषय बनला होता.
सेना-भाजपत गटबाजी!
पालिकेच्या चार जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत सेना - भाजपची युती होणार नाही, हे आधीच स्पष्ट झाले होते. युती व्हावी म्हणून काहीजणांनी मंगळवारपर्यंत प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. वादाचे काही मुद्दे सुटत नसल्यानेच युती होणार नाही, असे आता स्पष्ट झाले आहे. एकीकडे युती झाल्याशिवाय काही खरे नाही, अशी चर्चा शिवसेनेतच आहे तर दुसरीकडे सेनेत जुन्या नव्यांमुळे गटबाजी आहे. भाजपतही दोन तट आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातील ही गटबाजी राष्ट्रवादीच्या पत्थ्यावर पडणार काय, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
रत्नागिरीत ११ उमेदवारी अर्ज दाखल
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग २ व ४ मधील चार जागांसाठी येत्या १ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी बुधवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे उमेश शेट्येंसह ४ उमेदवारांनी तर भारतीय जनता पार्टीतर्फे २ अशा एकूण ६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, दोन्ही पक्षांतील डमी अर्जांमुळे बुधवारी दाखल झालेल्या अर्जांची संख्या ११ झाली आहे.
बुधवारी दुपारी सर्वप्रथम राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सेनेतून स्वगृही अर्थात राष्ट्रवादीत परतलेले उमेश शेट्ये यांनी प्रथम आपला अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर रुबीना मालवणकर, कौसल्या केतन शेट्ये व शिल्पा राहूल सुर्वे यांनी अर्ज दाखल केले. त्यावेळी रत्नागिरी शहरातील मान्यवर मंडळी त्यांच्यासोबत उपस्थित होती. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, राज्य मुस्लिम अल्पसंख्याक सेलचे नेते बशीर मूर्तुझा, तालुकाध्यक्ष सचिन तथा बबलू कोतवडेकर, शहर अध्यक्ष नीलेश भोसले, पालिकेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद नगरसेवक सुदेश मयेकर, नगरसेवक सईद पावसकर, पभाकर मयेकर, बबन आंबेकर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दुपारी दोन वाजल्यानंतर भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपने बुधवारी दोन अर्ज दाखल केले. त्यामध्ये सुवासिनी भोळे व निलीमा शेलार यांचा समावेश होता. यावेळी पालिकेतील भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजप शहर अध्यक्ष संजय पुनसकर यांच्यासह अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सेनेच्या बैठकांवर बैठका...
शिवसेनेतर्फे उमेदवारांची निश्चिती झाल्याची चर्चा बुधवारी दिवसभर होती. उमेदवार ठरविण्यासाठी बुधवारी सकाळी बैठक झाली. पुन्हा सायंकाळी सेनेची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. उमेदवारांची नावे निश्चित झाली तरी त्याबाबत सेनेच्या नेत्यांकडून गुप्तता पाळली जात होती. गुरूवारी सेनेच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली.
युती व्हायला हवी होती...
रत्नागिरी पालिकेच्या चार जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत सेना-भाजपची युती व्हायला हवी होती, असे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते कुजबुजत आहेत. चार वर्षांपूर्वी झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत युतीमुळेच २८ पैकी २१ जागा जिंंकता आल्या होत्या. आता स्वबळावर निवडणूक होत असल्याने व मतविभाजनाचा धोका आहे. त्यातच उमेश शेट्येंनी निर्माण केलेल्या आव्हानामुळे युतीसाठी ही पोटनिवडणूक डोकेदुखी ठरणार असल्याचीही चर्चा आहे.