रोज पाहतो मरण, तरीही रचतो सरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST2021-04-24T04:32:31+5:302021-04-24T04:32:31+5:30
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मृताचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नाहीत; ...

रोज पाहतो मरण, तरीही रचतो सरण
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मृताचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नाहीत; मात्र नगर परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांची टीम अंत्यसंस्कार करीत आहे. गेल्या महिनाभरात १०० कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळपर्यंत अंत्यसंस्काराचे काम सुरू असते. एकावेळी सहा लाकडावरील सरणावर व एक गॅसवरील शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. पीपीई किटमधील कर्मचाऱ्यांना उकाड्याने हैराण व्हायला होते; मात्र कर्तव्य म्हणून मंडळी अंत्यसंस्कार उरकत असतात.
अनेक रुग्णांचे नातेवाईक येतात; मात्र ते स्मशानभूमीच्या बाहेर थांबतात. आठवडाभरात मृतांची संख्या खूपच वाढली आहे. दिवसाला १६ ते १७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. एक सरण रचायला किमान २० ते ३० मिनिटांचा अवधी लागतो. अंत्यसंस्काराला येणारा मृतदेह प्लास्टिकमध्ये असतो; मात्र मृतदेह सरणावर ठेवण्यापासून अग्नि देण्याचे काम कर्मचारी करतात. मुस्लीम व ख्रिश्चन मृतदेहावरही त्या- त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार या टीमद्वारे करण्यात येत आहेत. काही अंत्यसंस्कारावेळी धर्मगुरू पीपीई किटमध्ये उपस्थित असतात.
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आणला जातो तेव्हा नातेवाइकांचा आक्रोश, आकांत ऐकून प्रचंड वेदना होतात; मात्र दहा जणांच्या टीमला विभागणी करून आळीपाळीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. पेटलेली चिता शांत झाल्यानंतर किमान पाच तासाचा अवधी घेतला जातो. पाणी मारल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सरण रचले जाते. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत काम सुरूच असते. अंत्यविधी आटोपून घरी गेल्यानंतर कर्मचारी कुटुंबात गेल्यानंतर दिवसभरातील वेदना पुसण्याचा प्रयत्न करतात.
काही वेळा मुलगा किंवा मुलगी बरोबर येण्याचा हट्ट धरतात. पीपीई किट घालूनच त्यांना स्मशानभूमीत येण्यासाठी प्रवेश दिला जातो; मात्र अग्नि देताना थरथरायला लागतात, अशावेळी शेवटी टीमपैकी कोणीतरी पुढे होऊन मदत करतो. त्यांचे दु:ख कर्मचाऱ्यांना वेदनादायक ठरते.
मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना कर्मचारी स्वत:च्या सुरक्षेसाठी लागणारे पीपीई किट परिधान करतात. रुग्णवाहिकेमधून मृतदेह आल्यानंतर स्ट्रेचरवरून मृतदेह स्मशानभूमीत नेला जातो. संबंधित धर्मियांच्या पद्धतीनुसार मृतदेहाचे दहन अथवा दफन करण्याचा विधी केला जातो. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ‘कोविड योद्धे’ निर्जंतुकीकरणाबरोबर स्वच्छतेनंतरच कुटुंबीयांमध्ये सहभागी होतात.
जितेंद्र विचारे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश कदम, जोगेंद्र जाधव, प्रभाकर कांबळे, बबन बेटकर, संकेत कांबळे, रोहित आठवले, नितीन राठोड, संतोष राठोड, नरेश राठोड, सुनील माटल, हरीश जाधव आदींची दोन पथकांत विभागणी करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य सुरू असून, अंत्यसंस्कारासाठीचा सर्व खर्च नगर परिषदेकडून करण्यात येत आहे.
कोट :
कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्थ झाली आहेत. मृतदेह घेऊन नातेवाईक येत असतात. दिवसाला १६ ते १७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना आम्हालाही प्रचंड वेदना होतात. नित्य कुटुंबांचा आक्रोश, आकांत ऐकताना मानसिक त्रास होत असतो; मात्र कर्तव्यामुळे विसरून पुन्हा कामाला लागावे लागते.
जितेंद्र विचारे.