प्रत्येक बाधित घटकाला मदत मिळावी, यासाठी मायक्रो प्लानिंग : डाॅ. बी. एन. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:32 IST2021-07-31T04:32:36+5:302021-07-31T04:32:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : चिपळूण आणि खेड तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्वच घटकांपर्यंत मदत जावी, यादृष्टीने मायक्रो प्लानिंग ...

प्रत्येक बाधित घटकाला मदत मिळावी, यासाठी मायक्रो प्लानिंग : डाॅ. बी. एन. पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : चिपळूण आणि खेड तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्वच घटकांपर्यंत मदत जावी, यादृष्टीने मायक्रो प्लानिंग करण्यात आले आहे, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला दिली. सर्व लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, जिल्ह्यातील सर्व आमदार आणि विविध सामाजिक संस्था यांच्या एकजुटीमुळेच जिल्हा प्रशासनाला मदतकार्यात अडचण आली नाही, असेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी आवर्जून सांगितले.
दि. २१ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे तसेच पुरामुळे चिपळूण, खेडमध्ये घरे, गाेठे, सार्वजनिक मालमत्ता, पाळीव जनावरे, शेती यांची अपरिमित हानी झाली. अनेकजण बेघर झाले. कित्येक भागात दरडी कोसळून अनेकांचे मृत्यू झाले. या पावसामुळे वित्तहानीबरोबरच प्राणहानीही झाली. सध्या पाऊस थांबल्याने जिल्हा प्रशासनाच्या मदतकार्याला वेगात सुरूवात झाली आहे. यासाठी दोन गोदामे अन्नधान्ये तसेच अन्य मदतीच्या वस्तूंनी भरलेली आहेत. वस्तू संकलनासाठी चिपळूण शहरात पाच संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. संकलनाच्या व्यवस्थेसाठी एनसीसी, होमगार्ड, शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. दरदिवशी दोन्हीवेळेला २० हजार शिवभोजन थाळ्यांची सोय चिपळूण आणि खेर्डी या भागात करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी दिली.
जिथे संपर्क होत नाही, अशांची यादी तयार करून अन्नधान्यांसह इतर जीवनावश्यक वस्तू तसेच औषधे, पाण्याच्या बाटल्या असे साहित्य संकलित करून प्रत्येक गावाला या सामानाचा एक ट्रक पाठविण्यात येत आहे. पूरपरिस्थितीमुळे या भागात रोगराईचा तसेच कोरोनाचा संभाव्य धाेका लक्षात घेऊन परिसरात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी भागातून १२० डाॅक्टरांचे पथक दाखल झाले आहे. तसेच जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निम्मे पथक चिपळुणात दाखल झाले आहे. बाहेरून मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन दाखल झाल्या आहेत. हे पथक घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी करत आहे. पुरवठा विभागाकडूनही मुबलक प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध केले असून, त्याचेही नियोजनबद्ध वाटप सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.