मरणानंतरही हाल, ग्रामकृती दले पीपीई किटविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:37+5:302021-04-25T04:31:37+5:30
रत्नागिरी : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हलविण्यासाठी पीपीई किट नाही, वाहन नाही, अशी अवस्था सर्व भागांत दिसत असून, ...

मरणानंतरही हाल, ग्रामकृती दले पीपीई किटविना
रत्नागिरी : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हलविण्यासाठी पीपीई किट नाही, वाहन नाही, अशी अवस्था सर्व भागांत दिसत असून, ग्रामकृती दले शस्त्राविनाच कोरोनाशी लढा देत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गुरववाडीतील एका कोरोनाग्रस्त प्रौढाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर, त्यांचा अंत्यविधीसाठी धावाधाव झाली होती. अखेर पुतण्या आणि काेरोनाबाधित मुलाने पीपीई किट घालून त्या प्रौढाचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून रुग्णालयाच्या स्वाधीन केला.
नेवरे गुरववाडीतील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर ५ दिवसांनी केलेल्या कोरोना चाचणीमध्ये तिचा पती आणि मुलगाही पॉझिटिव्ह आला. सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांनी त्यांना गृहअलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला. मात्र, पत्नी आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा ताण आल्याने या प्रौढ व्यक्तीचे शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.
ही बाब वाडीमध्ये पसरली. मात्र, त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने, खांदा देण्यासाठी कोणीही पुढे आले नाहीत. काही वेळाने सरपंच दीपक फणसे, पाेलीस पाटील गणेश आरेकर, सर्कल, तलाठी सर्फराज संदे, ग्रामपंचायत सदस्य शकील डिंगणकर यांनी मृताच्या घरी धाव घेतली. मात्र, पुढचा सोपस्कार करायचा कसा आणि कोणी, असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. ग्रामकृती दलाकडे पीपीई किट उपलब्ध नव्हते. त्यामुळे पीपीई किटसाठी धावाधाव करावी लागली. अखेर मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दोन पीपीई किट आणण्यात आले. त्यानंतर, मृत व्यक्तीचा पुतण्या आणि कोरोनाची लागण झालेल्या मुलगा यांनी पीपीई किट घालून मृतदेह कापड आणि प्लास्टीकमध्ये बांधला. मात्र, मृतदेह नेण्यासाठी लागणाऱ्या वाहनाचीही सोय नव्हती. पोलीस पाटील गणेश आरेकर, ग्रामपंचायत सदस्य शकील डिंगणकर यांनी रत्नागिरीतून शववाहिका मागवून त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. हे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी पहाटेचे ३ वाजले होते.
ग्रामकृती दले शस्त्राविनाच
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामकृती दलांवर मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र, या ग्रामकृती दलाच्या सदस्यांसाठी सॅनिटायझर, मास्क आणि आवश्यकता लागल्यास पीपीई किटची सोय करणे आवश्यक आहे. ती नसल्याने ग्रामकृती दले शस्त्राविनाच कोरोनाशी लढा देत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.
निर्जंतुकीकरण नाही
कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पुतण्याने घरातील इतरांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी घर निर्जंतुकीकरण करण्याची मागणी केली. मात्र, दुपार झाली, तरी त्याकडे कोणीही फिरकला नव्हता. त्याबद्दलही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
.....................
जिल्ह्यातील ग्रामकृती दलांना मास्क, सॅनिटायझर वगैरे देण्यासाठी ग्रामपंचायतींनी खर्च करावयाचा आहे. त्याबाबत सूचना देण्याचा विचार सुरू आहे.
- डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद, रत्नागिरी.