जैविक विविधता समित्या स्थापणार
By Admin | Updated: February 2, 2015 00:06 IST2015-02-01T22:28:58+5:302015-02-02T00:06:18+5:30
मुख्य कार्य म्हणजे स्थानिक लोकांशी विचारविनिमय करुन लोक जैविक विविधता नोंदवही तयार करणे,

जैविक विविधता समित्या स्थापणार
रत्नागिरी : जैवविविधता जपण्यासाठी ग्राम ते जिल्हास्तरावर जैविक विविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे़ त्यादृष्टीने जिल्ह्यात ८६५ समित्या गठीत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे़ जैवविविधता व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्य म्हणजे स्थानिक लोकांशी विचारविनिमय करुन लोक जैविक विविधता नोंदवही तयार करणे, स्थानिक जैविक संसाधनांची माहिती व उपलब्धता, त्यांचा वैद्यकीय किंवा कोणताही दुसरा उपयोग याची बहुव्यापक माहिती या नोंदवहीत ठेवण्यात येणार आहे़ तसेच स्थानिक वैद्य, वैदू, हकीम, पारंपरिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांची माहिती आणि शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शासकीय संस्था, अशासकीय संस्था, पीक वनस्पती प्रजाती, फळ झाडे प्रजाती, लोक जीवन, पिकांवरील कीड प्रजाती, भूमी रचना, औषधी वनस्पती प्रजाती, पाळीव प्राणी, मत्स्य संवर्धन प्रजाती, शोभेच्या वनस्पती, झाडे, झुडुपे, कंद, गवत, वेल, सागर किनारा, सागरी वनस्पती, वन्य प्राणी, सामाजिक आर्थिक रुपरेखा आदींची माहिती घेण्यात येणार आहे़ कीटकांचे निरीक्षण आणि त्यांचा संग्रह करणे, गोळा केलेल्या कीटक नमुन्यांची ओळख, त्यांची वैशिष्ट्ये, औषधोपयोगी सर्व्हेक्षण, जैविक वनस्पती धार्मिक कृत्यात आणि सामाजिक कार्यात वापर आदींची माहिती या समितीच्या वतीने नोंद करण्यात येणार आहे़ यामध्ये ८६५ व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. (शहर वार्ताहर)