दखलपात्रतेसाठी गावची वेस ओलांडा

By Admin | Updated: August 5, 2014 00:16 IST2014-08-04T21:59:37+5:302014-08-05T00:16:58+5:30

श्रीकृष्ण जोशी : गुणवत्ता टिकवण्यासाठी स्पर्धेत टिकून राहणे आवश्यक

To escape from the village | दखलपात्रतेसाठी गावची वेस ओलांडा

दखलपात्रतेसाठी गावची वेस ओलांडा


मेहरुन नाकाडे - रत्नागिरी , ‘रत्नागिरीमध्ये अनेक लेखक आहेत. मात्र, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंवा स्वत:च्या लेखनाची गुणवत्ता सिध्द करण्यासाठी लेखन शहराबाहेर पाठविणे गरजेचे आहे. कारण सध्या कथा, कादंबऱ्या लेखनाचा ट्रेड बदलत आहे. त्यामुळे लेखनाची गुणवत्ता ही बाहेरच सिध्द होते. फेसबुक किंवा व्हॉटस्अपसारख्या सोशल मीडियाचा वापर बरेच लेखक करतात. मात्र, त्याऐवजी लेखन करून पाठविले तर त्याची दखल निश्चितच घेतली जाते, असे मत लेखक व अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी व्यक्त केले.
संगीत नाटकांचा इतिहास जुना आहे. काळाच्या ओघात संगीत नाटक दुर्लक्षित होत असतानाच काही मोजक्या लेखक मंडळींबरोबर नाट्यकर्मींनी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेली संगीत नाटके राज्यात नव्हे; तर देशपातळीवर गाजली आहेत, किंबहुना पुरस्कारप्राप्त ठरली आहेत. सं. स्वरयात्री, सं. घन अमृताचा, सं. शांतीब्रम्ह, सं. राधामानस, सं. ऐश्वर्यवती, सं. ऋणानुबंध यांसारख्या नाटकांचे लेखन केले. त्यांनी लेखन केलेली संगीत नाटके खल्वायन संस्थेने सादर केली. संस्थेच्या कलाकार मंडळींनी घेतलेल्या परिश्रमामुळे या नाटकांनी विविध पुरस्कार मिळविले. राज्यपातळीवर ही नाटके अव्वल ठरल्यामुळेच अखिल भारतीय संगीत नाट्य स्पर्धा आयोजन करण्याचे यजमानपद रत्नागिरीला लाभले. शिवाय लेखनाची पारितोषिके डॉ. जोशी यांना लाभली आहेत. मध्यप्रदेशमध्ये सं. शांतीब्रम्ह तर फारच गाजले. गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात शांतीब्रम्हचा पहिला अंक झाल्यानंतर लेखक म्हणून प्रकट मुलाखत घेण्यात आली. दिल्ली, मध्यप्रदेश, गोवा, सांगलीतील प्रेक्षकांनी नाटक अक्षरश: डोक्यावर घेतले. पुण्यातील अण्णासाहेब किर्लोस्कर संस्थेतर्फे लेखनासाठी सं. बालगंधर्व पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाकडून कुसुमाग्रज पुरस्कार मिळाला. सं. घन अमृताचा नाटकाच्या दिल्लीतील प्रयोगावेळी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील वुमन्स फौंडेशनतर्फे सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘साहित्य भूषण’ पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे सं. ऋणानुबंध नाटकाला पुरस्कार मिळाला आहे. गोव्यातील संस्थेनेही सं. शांतीब्रम्ह, ऐश्वर्यवती नाटके सादर केले आहेत.
नाटक लिहिल्यानंतर लेखनाचे फेअर करण्याचे काम त्यांच्या पत्नी ऋचा जोशी करतात. नवीन सं. नाटकाचे लेखन सध्या सुरू आहे. नवीन लेखकांमुळे संगीत नाटकाला चांगले दिवस येणार आहेत. शास्त्रीय संगीत अनेक तरूण मंडळी शिकतात. त्यांना नाटकाच्या माध्यमातून उत्कृष्ट व्यासपीठ मिळत आहे. परंतु युवावर्गाने पुढे येणे गरजेचे असल्याचे जोशी यांनी सांगितले.

Web Title: To escape from the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.