महामारीत हजारो लोकांचे पाेट भरले; अनुदानाची वाट न बघता काम सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:38+5:302021-06-30T04:20:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटक उपाशी राहून नये, या हेतूने शासनाने दहा रुपयात सुरू ...

महामारीत हजारो लोकांचे पाेट भरले; अनुदानाची वाट न बघता काम सुरूच
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटक उपाशी राहून नये, या हेतूने शासनाने दहा रुपयात सुरू केलेली शिवभोजन थाळी आता मोफत दिली जात आहे. शासनाकडून ही थाळी देणाऱ्या केंद्रांना अनुदान दिले जाते. मात्र, मे महिन्याचे अनुदान अजूनही मिळाले नसल्याने हे केंद्रधारक या महिन्याच्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या काळात राज्यातील कोणीही गरजू माणूस उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन केंद्रात मोफत थाळी सुविधा देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात सध्या २२ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, त्यातील २१ केंद्रे सुरू असून, एक बंद आहे. शासनाने शिवभोजन थाळी २६ जानेवारी २०२० रोजी सुरू केली. जिल्ह्यात सुरुवातीला ही थाळी १० रुपयांमध्ये मिळत होती आणि प्रतिथाळी ४० रुपये केंद्रचालकाला अनुदान म्हणून मिळत होते. सध्या ही थाळी गरजू नागरिकांना मोफत दिली जात आहे. या योजनेचा १५ जून २०२१ पर्यंत तब्बल ९ लाख ५९ हजार ७४३ गरजुंनी लाभ घेतला आहे.
परंतु जिल्ह्यात या केंद्रचालकांचे मे महिन्याचे अनुदान मिळालेले नाही.
केंद्रचालक म्हणतात...
शिवभोजन थाळी केंद्राचे अनुदान नियमित होते.
मे महिन्याचे अनुदान काही कारणास्तव अडकले होते. मात्र, आता त्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा शाखेकडून सुरू आहे. आम्हाला पंधरा - पंधरा दिवसांचे अनुदान दिले जात आहे.
- शिल्पा सुर्वे, रत्नागिरी
काही महिन्यांपूर्वी अनुदान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मिळाले नव्हते. मात्र, आता अनुदान नियमित मिळत आहे. मे महिन्याचे अनुदान काही कारणास्तव निघाले नव्हते. मात्र, ते आता थोड्याच दिवसांत मिळणार आहे.
- गणेश धुरी, रत्नागिरी
काही ठिकाणी बाेगस लाभार्थी
शिवभोजन थाळी आता मोफत मिळू लागली आहे. त्यामुळे वारंवार एकच व्यक्ती याचा लाभ घेत असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले आहे. त्यामुळे या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येक केंद्रांवर शिवभोजन थाळीचा लाभ घेणारी व्यक्ती एकच आहे का, याचा शहानिशा करूनच केंद्रचालकांना अनुदान दिले जाते.
प्रतिथाळी ५० रुपयेे अनुदान
शासनाने गरजू, कष्टकरी, कामगार वर्गाची उपासमार टाळण्यासाठी २०२० मध्ये शिवभोजन थाळी १० रुपयांत सुरू केली. त्यासाठी केंद्र चालकांना प्रतिथाळी ४० रुपये अनुदान दिले जात आहे. सध्या ही थाळी मोफत दिली जात आहे. त्यामुळे केंद्र
चालकांना आता पुन्हा ५० रुपये प्रतिथाळी असे अनुदान दिले जात आहे.
थाळी संख्या घटली...
शासनाने १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली. मात्र, कोरोना काळात लाॅकडाऊन असल्याने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष केंद्रात बसून खाण्याऐवजी पार्सल सुविधा सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे लाॅकडाऊन काळात अनेक गरजूंना बाहेर पडता येत नसल्याने थाळ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे आता सर्वच शिवभोजन केंद्रांवरील थाळ्यांची संख्या घटली आहे.
अनुदान देताना थाळी घेणाऱ्यांची संख्या आणि त्यांचे फोटो, याची पडताळणी करावी लागते. बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ही खबरदारी घ्यावी लागते. यासाठी वेळ अधिक लागतो. या प्रक्रियेमुळे मे महिन्याचे अनुदान निघाले नव्हते. परंतु आता थोड्याच दिवसात तेही निघेल.
- ऐश्वर्या काळुसे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी