पर्यावरण मंत्री नव्हेत; ते तर पऱ्यावरचे मंत्री

By Admin | Updated: October 30, 2015 23:40 IST2015-10-30T21:42:12+5:302015-10-30T23:40:27+5:30

भास्कर जाधव : रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल--रणसंग्राम

Environment Minister He is the minister of the future | पर्यावरण मंत्री नव्हेत; ते तर पऱ्यावरचे मंत्री

पर्यावरण मंत्री नव्हेत; ते तर पऱ्यावरचे मंत्री

मंडणगड : हे पर्यावरण मंत्री नव्हेत ते पऱ्यावरचे मंत्री आहेत. रामदास कदम म्हणजे नमनातला बुवा असल्याचा घणाघाती हल्लाबोल आमदार भास्कर जाधव यांनी मंडणगड येथे महाआघाडीच्या प्रचारसभेत केला.़ यावेळी त्यांनी पंचवीस वर्षे तालुक्यात सत्ता असतानाही शहराला विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचे पाप शिवसेनेच्या नेत्यांनी करुन मंडणगड शहरातील जनतेची घोर फसवूणक केली आहे़ त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत येथील मतदार सेनेला धूळ चारतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मंडणगड शहरातील जनता विकासासाठी आसुसलेली आहे. जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे.़ शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे़ शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, अंतर्गत सुविधा यापासून सत्ता असूनही शिवसेनेने वंचित ठेवले आहे. जनतेच्या समस्या न सोडवता केवळ भावनिक आणि विद्वेषाचे राजकारण करून निवडणुका जिंकणे हेच शिवसेनेचे काम आहे़ शिवसेनेच्या नेत्यांना जनतेच्या विकासाचे प्रचंड वावडे आहे. त्यांच्या बेपर्वाईमुळेच मंडणगडमधील जनता विकासापासून शेकडो मैल दूर आहे. जाती-धर्माचे राजकारण करून दलित, मुस्लीम, महिलांचा अपमान करून जनतेला समस्यांच्या विळख्यात अडकवून ठेवणाऱ्या शिवसेनेला मंडणगड शहरातील विकासासाठी आसुसलेल्या जनतेने जागा दाखवावी, असे आवाहन केले़
मंडणगड येथे राष्ट्रवादी-काँग्रेस आणि रिपाइं महाआघाडीच्या मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत बोलताना आमदार जाधव यांनी विकासाची नेमकी संकल्पना काय आणि भावनिक राजकारणामुळे जनतेचे होणारे नुकसान या गोष्टींना हात घालत जणू मंडणगडवासियांशी संवादच साधला. आमदार भास्कर जाधव यांच्या सभेला मंडणगड शहरातील नागरिकांनी केलेली गर्दी सभा जिंकून गेली़
आज ग्रामीण भागाचे शहरीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे तालुक्यांच्या ठिकाणी नगरपंचायती करण्याचा निर्णय आमच्या आघाडी सरकारने केला. यामागे या शहरांचा विकास करून जनतेला मुलभूत सोयीसुविधा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही हे करू ते करू म्हणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी यापूर्वी काय केले? या मतदार संघाचे आमदार संजय कदम हे एकाचवेळी सुमारे दहा कोटींचा निधी आणू शकतील, त्यांच्यात तुमचा आणि शहराचा विकास करून तुमच्या मुलभूत समस्या सोडवण्याचा प्रचंड आत्मविश्वास आहे. याच आत्मविश्वासाला आणि शहराच्या विकासाला मतदान करून विकासाची कास धरण्याची गरज
आहे़
मंडणगड शहरातील जनतेला नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायतीची निर्मिती झाली आहे. शहरातील जनतेला शिक्षण, आरोग्य, पाणी, शौचालये, मुताऱ्या, गटारे आदी विविध सुविधा तसेच पर्यटनदृष्ट्या शहराचा विकास करणे, शहराचा विकासात्मक नवा आराखडा तयार करून मंडणगड शहराची बकाल अवस्था घालवून शहर स्मार्ट बनवण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे मंडणगड शहरातील समस्या सोडवण्याची क्षमता महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये आहे. त्यांच्या पाठीशी आमदार संजय कदम ठामपणे उभे आहेत. त्यामुळे जनतेला विकास पाहिजे की, भूलथापा याचा विचार मंडणगडमधील सुज्ञ जनता नक्की करेल़
आमदार संजय कदम यांनी सांगितले की, शिवसेनेच्या मंत्र्यांना जनताच नाकारत आहे. त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने सेनेचे नेते बिथरलेले आहेत. आम्हाला मंडणगड शहराचा विकास महत्वाचा आहे. एकवेळ सत्ता द्या, मंडणगड शहर राज्यातील एका आदर्श शहर म्हणून अल्पावधीतच नावारूपाला येईल, असा आशावाद आमदार संजय कदम यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर, खेडचे तालुकाध्यक्ष स. तु. कदम, सुनील चव्हाण, रिपाइंचे कोकण प्रदेशाध्यक्ष सिद्घार्थ कासारे, ज्येष्ठ नेते दादा मर्चंडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, अस्मिता केंद्रे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष भरत यादव, काँग्रेसचे सरचिटणीस संतोष मांढरे, युवानेते संदेश चिले, शहराध्यक्ष वैभव कोकाटे, अनिल घरटकर, सुनील घरटकर, गणेश जोगी, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, ज्येष्ठ नेते दौलतराव पोष्टूरे, विजय डोईफोडे, विजय पोटफोडे, अरुण घोसाळकर, चेतन सातोपे, महेश कासारे, अनिल रहाटे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)


खडा सवाल : जनतेने शिवसेनेला का नाकारले?
मंडणगड हे एतिहासिक शहर आहे़ मात्र, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि दोनवेळा मंत्रीपदाची शाल घेऊन मिरवणारे रामदास कदम यांनी गेल्या २५ वर्षांच्या काळात मंडणगड शहराच्या विकासासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करून जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या विकासासाठी मी मंत्री तसेच आमदार असताना कोट्यवधींचा निधी दिला आहे. नगरपंचायतीवर सत्ता कोणाची आहे याचा मी कधीच विचार केला नाही़ मात्र, आज जिल्ह्यातील सातही नगरपंचायतींमध्ये जनतेने शिवसेनेला नाकारले आहे. याचे कारण काय ?


नेत्यांवर आगपाखड
मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार आगपाखड केली. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, रामदास कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले.

Web Title: Environment Minister He is the minister of the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.