आरक्षण असेल तरच स्थानकात प्रवेश; तपासणीनंतरच स्थानकात सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:48+5:302021-09-11T04:32:48+5:30
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. शनिवारपासून अनेकांचा परतीचा प्रवास सुरू होईल. मात्र, ज्या ...

आरक्षण असेल तरच स्थानकात प्रवेश; तपासणीनंतरच स्थानकात सोडणार
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. शनिवारपासून अनेकांचा परतीचा प्रवास सुरू होईल. मात्र, ज्या प्रवाशांकडे आरक्षण आहे, अशाच प्रवाशांनी स्थानकात यावे. आरक्षण नसलेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही, असा कोकण रेल्वेने निर्णय जाहीर केला आहे.
मुंबईतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांकरिता कोकण रेल्वेने या वर्षी मोठे नियोजन केले आहे. २२५ हून अधिक फेऱ्यांच्या माध्यमातून कोकण रेल्वे कोकणी गणेश भक्तांना कोकणात आणत आहे. गणेश भक्ताच्या परतीच्या प्रवासाचेही कोकण रेल्वेने मोठे नियोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेही गर्दी होऊ नये, याकरिता कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात बॅरेकेटिंग करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून येथे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. नोंद घेतली जात आहे. आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचे नियंत्रण केले जात आहे.
आता दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होईल. यावेळी केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांच्याकडे आरक्षण नाही, अशा मंडळींनी स्थानकावर गर्दी करू नये. त्यांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही. आरक्षण असलेल्या मंडळीनीही तपासणीकरिता आपल्या ट्रेनच्या निर्धारित वेळेपूर्वीच उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.