वातावरण हापूसला पोषक
By Admin | Updated: November 23, 2015 00:23 IST2015-11-22T21:36:49+5:302015-11-23T00:23:59+5:30
कमी पाऊस : प्रकाश संश्लेषणामुळे पानात अन्नरस तयार

वातावरण हापूसला पोषक
शिवाजी गोरे -- दापोली -यावर्षी कमी पाऊस पडल्याने आंबा पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस लवकर गेल्यामुळे स्वच्छ व शुभ्र वातावरणामुळे आंब्यावर अधिक प्रकाशकिरणे पडली. प्रकाश संश्लेषण योग्य पद्धतीने झाल्यामुळे आंब्याच्या पानात अधिक अन्नरस तयार झाला असून यावर्षीच्या हंगामातील वातावरण हापूस आंब्याला पोषक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.दरवर्षीपेक्षा यावर्षी ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. या कमी पावसाचा आंबा पिकावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. याचे कारण म्हणजे जमिनीत अजूनही ओलावा आहे. आकाश पांढरे शुभ्र व हवामान पिकाला पोषक असल्याने आंब्याच्या पिकाला लागणाऱ्या अन्न घटकांची योग्यप्रकारे वाढ झाली आहे. दरवर्षी पावसाचे हंगामात ही वाढ होत असते. त्यामुळे वातावरण ढगाळ असते. तसेच पाऊस पडत असतो. त्यामुळे आंब्याच्या पिकाला लागणारे योग्य अन्नघटक पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाहीत. त्यामुळे दरवर्षी आंब्याच्या पिकात घट होते. परंतु, यावर्षी योग्य प्रकाश संश्लेषण झाल्याने हापूसला ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.आंबा कलमांना पालवी फुटल्याने आता शेतकऱ्यांना पालवीची प्रतीक्षा आहे. येत्या दोन आठवड्यात कलमावर मोहर येण्याची शक्यता आहे. मोहर आल्यावर वातावरण कोणत्या पद्धतीचे राहील यावर बरंच काही अवलंबून आहे. मात्र, सध्यातरी पानामध्ये अन्नरस योग्य पद्धतीने निर्माण झाला आहे. कलमावरील पालवी मोहरास योग्य झाल्याने थंडीची सुरुवात होताच आंबा कलमांना मोहर येण्याची शक्यता आहे. परंतु, ही थंडी लवकर जायला हवी. अधिककाळ थंडीची लाट राहिल्यास आंबा कलमावरील मोहरावर विविध रोगांचा प्रादूर्भाव होईल. यामुळे आंबा हंगाम लांबण्याची शक्यता अधिक आहे.हवामानातील बदलाचा आंबा कलमावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शेतकऱ्याने पहिली फवारणी करणे गरजेचे होते. शेतकऱ्याने पहिली फवारणी योग्यवेळी केली असेल त्यानंतर त्याने दुसरी फवारणी करणे गरजेचे आहे. कारण मोहर आल्यानंतर तुडतुडे मोहरातील कोवळ्या फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर गळून पडतो. याशिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात. तो पानावर पडून नंतर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडे व फळे काळी पडतात. आंबा पिकाला उत्तम निचऱ्याची जमीन लागते. थोड्याशा आम्लयुक्त जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. कोकणातील डोंगर उताराच्या व वरकस पडीक जमिनी या पिकास योग्य आहेत. भारी चिकणमातीच्या पाणी साठून राहणाऱ्या तसेच खार जमिनी या पिकाच्या लागवडीस योग्य नाहीत.
मोहर येण्याच्या कालावधीत चांगले वातावरण असेल व पाऊस नसेल तर आंबा पिकाला याचा फायदा होणार आहे. थंडी उशिरा सुरु झाल्याने यावर्षी आंब्याचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.
- जे. एम. घोडके,
उपविभागीय कृषी अधिकारी, दापोली.