पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांचे भोग सुरूच!
By Admin | Updated: August 8, 2014 00:43 IST2014-08-07T20:39:42+5:302014-08-08T00:43:17+5:30
पाटण तालुका : गावठाण भागातील इमारतींचे पत्रे-खिडक्या गायब

पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांचे भोग सुरूच!
ढेबेवाडी : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांमधील प्राथमिक शाळंच्या इमारती बांधून सात वर्षे पूर्ण झाली़ या इमारतींमध्ये अध्यापनाचे काम चालू होण्यापूर्वीच या शाळा इमारतींचे पत्रे, खिडक्या दरवाजे गायब झाले़ तर काही गावठाणात शाळेच्या इमारतीत गवताच्या गंजी लावल्याचे चित्र बघायला मिळते़ या इमारतींना किती दिवस विद्यार्थी आणि शिक्षिकांची प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे़
वांग-मराठवाडी प्रकल्पांतर्गत विस्थापित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा- सांगली जिल्ह्यांतच होत आहे़ यापैकी ज्या गावांचे पुनर्वसन सांगली जिल्ह्यात झाले आहे़ त्याठिकाणी अपवाद वगळता १३ नागरी सुविधांसह गावठाणे परिपूर्ण झाल्याचे चित्र आहे़ तर काही गावांचे पुनर्वसन कोळेवाडी, घारेवाडी (ता़ कऱ्हाड), ताईगडेवाडी (ता़ पाटण), येथे करण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून चालू आहे़
प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार वीज, रस्ते, पाणी, प्राथमिक शाळा आदींसह तेरा नागरी सुविधांची पूर्तता करून गावठाणे प्रकल्पग्रस्तांच्या ताब्यातही देण्यात आली आहेत़ त्यापैकी ताईगडेवाडी गावठाणात बहुतेक प्रकल्पग्रस्तांनी घरे बांधून दोन वर्षांपासून वास्तव्यही चालू केले आहे़ मात्र, घरेवाडी आणि कोळेवाडी येथील गावठाणांकडे अजूनही प्रकल्पग्रस्त फिरकलेलेच नसल्याने तेथे बांधण्यात आलेल्या प्राथमिक शाळा इमारतींची मोठी दुरवस्था झाली आहे़
आध्यापनापूर्वीच इमारतींचे दरवाजा-खिडक्यांची मोडतोड करून खिडक्या गायबही झाल्या आहेत़ (प्रतिनिधी)