अभियंते, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे

By Admin | Updated: March 30, 2015 00:14 IST2015-03-29T23:44:53+5:302015-03-30T00:14:59+5:30

ओमप्रकाश गुप्ता : मुख्यामंत्र्यांच्या सुचनेनुसार अपेक्षित बदल घडवणार

Engineers, employees should stay in the headquarters | अभियंते, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे

अभियंते, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे

रत्नागिरी : शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात समाधानकारक सेवा देण्यासाठी महावितरणने चंग बांधला असून, त्याप्रमाणे काम करण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश गुप्ता यांनी केले आहे. त्याचबरोबर महावितरण कंपनीचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच राहावे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.
ग्रामीण भागात आजही तासन्तास वीज खंडित होण्याच्या घटना घडतात. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने तातडीने दखल घेतली जात नाही. कामाच्या ठिकाणी अभियंता किंवा लाईनमन उपलब्ध नसतात. ही स्थिती केवळ अतिहानीमुळे भारनियमन सुरू असलेल्या भागाचीच नाही, तर भारनियमन नसलेल्या ग्रामीण भागात असल्याच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला कार्यपध्दतीत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अमूलाग्र बदल करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. याबाबत गुप्ता यांनी महावितरणतर्फे प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही चांगली सेवा देण्यासाठी महावितरणला लोकसहभाग वाढवण्याची आवश्यकता आहे. अभियंते व कर्मचारी मुख्यालयी राहण्यासाठी गुप्ता यांनी स्पष्ट सूचना केल्या आहेत. ग्रामीण भागात खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत वस्तुस्थितीची माहिती व्हावी, यासाठी यापुढे एक रजिस्टर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ठेवण्याची सूचना केली आहे. त्यात खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा संपूर्ण तपशील ग्रामपंचायतीतर्फे नोंदविला जाणार आहे. शिवाय ग्राहकांना या रजिस्टरमध्ये वीजविषयक तक्रारीही नोंदविता येणार आहेत, असे गुप्ता यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवीन जोडण्या देताना कोणताही गैरप्रकार होऊ नये किंवा किमान वेळेत जोडण्या मिळाव्यासाठी आॅनलाईन यंत्रणा उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु अद्याप या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर होताना दिसत नाही. शिवाय जोडण्यांमध्ये विलंब होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना जोडण्या देण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.
‘ग्राहक आहेत म्हणून आपण आहोत’ याचे भान महावितरणच्या प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांने ठेवून ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे गुप्ता यांनी सांगितले. विद्युत अधिनियम २००३ मधील सुधारणा लवकरच कायद्याचे रूप घेणार आहे. परंतु महावितरणच्या कार्यपध्दतीतील बदल कायद्यातील बदनापेक्षा केला तर जनमानसातील महावितरणची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल. शिवाय मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेली यंत्रणा देता येईल, असे गुप्ता यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Engineers, employees should stay in the headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.