आंबा हंगामाची अखेर
By Admin | Updated: May 28, 2014 01:32 IST2014-05-28T01:24:35+5:302014-05-28T01:32:35+5:30
नेपाळी गुरख्यांचा परतीचा प्रवास सुरु

आंबा हंगामाची अखेर
उमेश पाटणकर ल्ल रत्नागिरी मुंबईकरांना हापूसची चव मनमुराद चाखता यावी, यासाठी थंडी, वारा, ऊन, जंगली श्वापद यांची तमा न बाळगता प्रसंगी स्वत:चे प्राणही पणाला लावणारे राखणदार आपल्या घराकडे परतू लागले आहेत. रत्नागिरीमधून त्यांच्या गावाजवळ जाण्यासाठी रेल्वेची सोय असली तरी कोल्हापूर मार्गे जाणे त्यांनी पसंत केलेय. प्रामाणिक कामगार म्हणून नावलौकीक असणारे नेपाळी गुरखे यावर्षीचा आंबा हंगाम संपल्याने नेपाळकडे परतू लागले आहेत. कोकणचा आर्थिक गाडा सांभाळणार्या हापूसचा हंगाम सर्वसाधारपणे नवरात्र - दिवाळी दरम्यान सुरु होतो. झाडांवर कैरी दिसू लागताच बागायतदारांची राखणीसाठी धावपळ सुरु होते. कारण माकडांचा याच काळात उपद्रव मोठ्या प्रमाणात सुरू होतो. अशावेळी त्यांच्या नजरेसमोर येतो तो गुरखा. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नेपाळी नागरिक कोकणात मोठ्या प्रमाणात येतात. आंबा बागेच्या राखणीसाठी त्यांचा कल असला तरी बागायतदार जुन्या गुरख्यांनाच राखणीसाठी ठेवतात. नव्याने आलेले गुरखे राखणदारीचे काम मिळाले नाही म्हणून नाराज न होता अन्य कामेही करु लागले. १५ ते २० वर्षांपूर्वी केवळ बागायतींची राखणी जीवापाड करणारे गुरखे गेल्या चार-पाच वर्षांत औषध फवारणीसह आंब्याची काढणीही करु लागले. उंच झाडांवर शेंड्यापर्यंत जाण्यास घाबरणार्या स्थानिक कामगाराची जागा गुरख्यांनी कधी घेतली हे स्थानिकांना कळलेच नाही. या नेपाळी युवकांनी आपल्या कामाची प्रगती यापुढेही नेत आंबा हाताळणी, पेट्या भरणे, वाहतूक करण्यासाठी चारचाकी गाड्या चालवण्यापर्यंत मजल मारली आहे. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होईल. नेपाळमध्येही जूनच्या मध्यापर्यंत पाऊस सुरु होत असल्याने तत्पूर्वी गावाकडे पोहोचून शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी गुरखे माघारी निघाले आहेत. आज रहाटाघर बसस्थानकातून किमान १०० गुरखे कोल्हापूरकडे रवाना झाले, तर रेल्वेस्टेशनकडून १५० पेक्षा जास्त गुरखे दिल्लीकडे गेले.