स्मशानातील चितांचे निखारे सतत धगधगतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST2021-04-24T04:32:19+5:302021-04-24T04:32:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दापोली : स्मशानातील निखारे गेले काही दिवस सतत धगधगते असून, ते विझण्याची वेळच आलेली नाही. कोरोनाच्या ...

स्मशानातील चितांचे निखारे सतत धगधगतेच
लोकमत न्यूज नेटवर्क
दापोली : स्मशानातील निखारे गेले काही दिवस सतत धगधगते असून, ते विझण्याची वेळच आलेली नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचा वेग चाैपट वाढला आहे. दिवसागणिक चार ते पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर येऊन ठेपली आहे. एकीकडे रुग्णांना बेड नाहीत आणि दुसरीकडे मृतदेहाला अग्नी देण्यासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे.
आरोग्य यंत्रणेच्या निकषांप्रमाणे हे अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र मृतांची संख्या वाढली असल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी दापोलीत गेले आहेत. कोरोना दाखल झाल्यापासून वर्षभरात दापोलीत जेवढे मृत्यू झाले नव्हते, तेवढे मृत्यू एप्रिल महिन्यात झाले आहेत. २० दिवसांत तब्बल ४० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, दापोली नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आता दररोज चार ते पाच लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे एक चिता विझण्याआधीच दुसरा मृतदेह नेण्याची वेळ येत आहे.
गावबंदी, मृतदेह नाकारणे, अंत्यसंस्कारास नकार देणे, गावकऱ्यांचा विरोध यांसारख्या अनेक घटना गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी घडल्या आहेत. अशा कठीण काळातही दापोली नगरपंचायतीमधील आरोग्य स्वच्छतादूत मंगेश जाधव, संदीप डिंगणकर (मुकादम), दीपक गोरीवले, राजेश टांक, शैलेश पवार, राजेश जाधव, सचिन घाग, श्रीकांत पवार, अनिल चोरगे, दीपक भांबीड, संजय धोपट, गजानन म्हसकर, संतोष गायकवाड, स्वप्निल वाघमारे, प्रवीण गमरे हे कर्मचारी जीव धोक्यात घालून २४ तास काम करीत आहेत.
....................
अस्थायी कर्मचारी
कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करणारे हे कर्मचारी अस्थायी आहेत. त्यांना कोणतेही संरक्षण नाही. तरीही ते २४ तास जीव धोक्यात घालून काम करीत आहेत, याची सरकारने दखल घ्यावी, अशी अपेक्षा केली जात आहे.
तोडगा काढणार
दापोली आणि गुहागरमध्ये ग्रामपंचायतींनी मृतदेह नाकारल्याचे प्रकार घडले आहेत. त्याची दखल घेण्यात आली आहे. तालुका पातळीवरील स्मशानभूमीवर येणारा ताण पाहून आता पंचक्रोशीसाठी एका ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी संबंधितांना पीपीई किट पुरविण्यात येतील. तसेच त्यांना प्रशिक्षणही दिले जाईल, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी म्हटले आहे.