गुहागरच्या एचपीसीएल प्रकल्पाविरोधात एल्गार
By Admin | Updated: November 18, 2015 00:05 IST2015-11-17T23:25:10+5:302015-11-18T00:05:12+5:30
गुहागर तालुक्यातील तवसाळ, काताळे, कर्दे, दोडवली आदी गावातील परिसरात येऊ घातलेल्या एचपीसीएल रिफायनरी प्रकल्पाविरोधात येथील आठ गावांनी कर्दे गावाच्या सीमेवरील तरमळा येथे मेळावा घेऊन एल्गार फुंकले.

गुहागरच्या एचपीसीएल प्रकल्पाविरोधात एल्गार
गुहागर : रासायनिक प्रकल्प आणून प्रकल्पाच्या नावाखाली स्थलांतरितांचे पुनर्वसन होत नाहीच, उलट ते विस्तापित होतात. कोकणाबाहेरील व्यक्तींनी कोकणाच्या विकासावर बोलू नये, तो अधिकार आम्हाला द्या, कोकणच्या निसर्गाचे संगोपन, संवर्धन करून विकास साधण्याचा सरकारने प्रयत्न करावा. मात्र, कोकणावर लादण्यात येत असलेल्या विनाशकारी प्रकल्पाविरोधात मोठी फळी उभारण्याची आज गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष अमजद बोरकर यांनी केले.
गुहागर तालुक्यातील तवसाळ, काताळे, कर्दे, दोडवली आदी गावातील परिसरात येऊ घातलेल्या एचपीसीएल रिफायनरी प्रकल्पाविरोधात येथील आठ गावांनी कर्दे गावाच्या सीमेवरील तरमळा येथे मेळावा घेऊन एल्गार फुंकले. या मेळाव्यातून ते येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. मेळाव्याच्या सुरुवातीलाच येथील तवसाळ, काताळे, कर्दे, दोडवली आदी गावातील स्थानिकांजवळ कोणतीच चर्चा न करता निवडणूक जिंंकल्यावर व मंत्रीपद मिळाल्यावर अनंत गीते जिल्ह्यात जिथे संधी मिळेल तिथे तवसाळ व आजुबाजुच्या परिसरात जगातील सर्वांत मोठा प्रकल्प आणण्याचे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्दे येथील अरविंंद भोळे, गिरिजा राऊत, माजी सभापती दत्ताराम निकम, प्राध्यापक सदानंद पवार, नीलेश सुर्वे, संतोष बारस्कर, सलीम मौला, इम्प्तीयाज भाटकर, महादेव माटल, संतोष माने, गणेश येद्रे, आशीर्वाद बारस्कर, मनसुर सोलकर, शंकर येद्रे, विजय नाचरे, विलास नाचरे, संजय येद्रे, विजय मोहिते यावेळी उपस्थित होते. आठ गावातील कुणबी समाजाचे मुंबई येथील युवकवर्ग तवसाळ, तवसाळखुर्द, काताळे, कर्दे, दोडवली, जांभारी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)