अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी अखेर जाहीर
By Admin | Updated: July 4, 2014 00:26 IST2014-07-04T00:08:22+5:302014-07-04T00:26:03+5:30
अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी अखेर जाहीर

अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी अखेर जाहीर
नाशिक : अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी अखेर जाहीर झाली असून, अपेक्षेप्रमाणे विज्ञान शाखेसाठी प्रचंड चुरस दिसून आली. विज्ञान शाखेचे खुल्या प्रवर्गासाठीचे प्रवेश ९१ ते ९३ टक्क्यांपर्यंत निश्चित झाले आहेत, तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्येदेखील गुणांची स्पर्धा दिसून आली. या प्रवर्गातील कट आॅफ लिस्ट ८५ ते ९० टक्क्यांवर क्लोज झाली. गुरुवारपासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ होणार आहे.
सायंकाळी चार वाजेच्या सुमारास महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर गुणवत्ता यादी लावण्यात आली होती, तर बहुतांश महाविद्यालयांनी आपापल्या संकेतस्थळावर गुणवत्ता यादी प्रकाशित केली. त्यामुळे दरवर्षी यादी पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आले. शहरातील सर्व महाविद्यालयांनी दुपारी साडेतीन वाजेपासून गुणवत्ता यादी जाहीर करण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक महाविद्यालयांत अर्ज दाखल केले होते अशा विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयांतीलही यादी पाहता आली. यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने गुणवत्ता यादी करताना महाविद्यालयाची चांगलीच दमछाक झाली. सर्व सामाजिक आरक्षणे, संस्था कोटा, खेळाडूंचा कोटा तसेच विशेष विद्यार्थी कोटा सांभाळून गुणवत्ता यादी करण्याची कसरत महाविद्यालयांना करावी लागली. खुल्या आणि राखीव गटातील विद्यार्थ्यांनीदेखील यंदा भरघोस गुण मिळविल्याने कट आॅफमध्ये फारसा फरक नसल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात आले. शुक्रवारपासून म्हणजेच ४ तारखेपासून प्रवेश सुरू होणार आहेत. सदर प्रवेशाची प्रक्रिया ही सोमवार, दि. ७ पर्यंत सुरू राहणार आहे. ८ तारखेला दुसरी गुणवत्ता यादी म्हणजेच प्रतीक्षा यादी जाहीर होणार आहे. (प्रतिनिधी)