अकरा हजार क्विंटल भात अद्याप गोदामात पडून

By Admin | Updated: December 15, 2015 00:38 IST2015-12-14T23:52:41+5:302015-12-15T00:38:32+5:30

मार्केटिंग फेडरेशन : ई - लिलावाव्दारे १३ हजार क्विंटलची विक्री

Eleven thousand quintals of rice are still in the godown | अकरा हजार क्विंटल भात अद्याप गोदामात पडून

अकरा हजार क्विंटल भात अद्याप गोदामात पडून

रत्नागिरी : शासनाकडून मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. मात्र, ई - लिलाव प्रक्रिया रखडल्यामुळे खरेदी केलेले भात संघाच्या गोदामात पडून होते. २४ हजार ४९८.४६ क्विंटल भातापैकी आतापर्यंत दोन टप्प्यात ई -लिलावाव्दारे १३२०४.६५ क्विंटल भाताची विक्री झाली आहे. अद्याप ११ हजार २९३.२१ क्विंटल भात शिल्लक राहिले आहे.गतवर्षी भात खरेदी करण्यात आली नसल्यामुळे दोन वर्षांपूर्वीचे भात संघाच्या गोदामात लिलाव प्रक्रियेअभावी पडून होते. दोन वर्षे भात गोदामात ठेवूनदेखील शासनाने केवळ दोन महिन्याचे भाडे देण्याचे निश्चित केल्याने संघाचे दहा महिन्यांचे भाडे बुडाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी भात खरेदीचे आदेश येऊनही भात खरेदीसाठी संघाची मानसिकता नाही. सध्या उंदीर घुशीमुळे भाताचे नुकसान होत आहे. शिवाय खरेदीनंतर ते लिलाव प्रक्रियेपर्यंत संरक्षित ठेवण्याची जबाबदारी संघाकडे असल्यामुळे आर्थिक भुर्दंड संघाला बसत आहे. यावर्षी भात खरेदीसाठी आदेश काढण्यात आले आहेत. सर्वसाधारण भातासाठी क्विंटलला १४१० रुपये, तर ‘अ’ वर्गातील भातासाठी क्विंटलला १४५० रुपये दर निश्चित केला आहे. यावर्षीपासून २०० रूपये बोनस मात्र शासनाने रद्द केला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य पीक भात आहे. परंतु जिल्ह्यात भाताची प्रोसेसिंग मिल नसल्यामुळे रायगड व कोल्हापूर जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागते. प्रोसेसिंग मिलधारकदेखील वाहतूक खर्च, मिलिंग खर्च एकत्र करून टेंडर सादर करतो. परंतु दरामुळे प्रोसेसिंग प्रक्रियाच रखडली होती. शासनाकडून दोन वर्षांपूर्वी दि मार्केटिंग फेरडेशनच्या माध्यमातून भात खरेदी केली. परंतु संबंधित भात अद्याप खरेदी - विक्री संघाच्या गोदामात पडून राहिल्यामुळे उंदीर आणि घुशीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरेदी केलेले व शिल्लक भात यामध्ये तफावत आहे. (प्रतिनिधी)

लिलाव झालेले भात (क्विंटलमध्ये)
मिरवणे२०२१.२०
आकले४४३.६०
खेड४५३०
शिरळ१५०१.१०
राजापूर१७९२.८०


गोदामात असलेले भात (क्विंटलमध्ये)
निवळी५६०.४०
केळशी१०७७.०१
गुहागर१६५९.६०
रत्नागिरी११०५.६०
संगमेश्वर२५०७.६०
पाचल९९४.८०

Web Title: Eleven thousand quintals of rice are still in the godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.