हत्ती गेला शेपूट उरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:55+5:302021-04-09T04:32:55+5:30

दुसऱ्यांदा लॉकडाऊनला सामोरे जाताना सर्वसामान्य जनता भरडली जाणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर व्यापारी व उद्योजकही या दुसऱ्या लाटेत उद्ध्वस्त ...

The elephant went and the tail remained | हत्ती गेला शेपूट उरले

हत्ती गेला शेपूट उरले

दुसऱ्यांदा लॉकडाऊनला सामोरे जाताना सर्वसामान्य जनता भरडली जाणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर व्यापारी व उद्योजकही या दुसऱ्या लाटेत उद्ध्वस्त होण्याची चिन्हे आहेत. कारण पहिल्या लॉकडाऊनमध्येच त्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्याचवेळी उद्योग, व्यवसायासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर परिणाम झाला होता. आता लोक हळू हळू सावरत होते. पण पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याने काय होईल याची चिंता वाटत आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका छोटे दुकानदार आणि लघुउद्योगांना बसणार आहे. कारण कामगार व नोकरदारांपासूनचे प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहेत. याआधीच्या लॉकडाऊनमध्ये सोडून गेलेल्या काही कामगारांना काही व्यावसायिकांनी हात-पाय जोडून कामावर आणले आहे. आपल्या व्यवसायाची घडी विस्कळीत होऊ नये यासाठी अनेक प्रकारचे खटाटोप काहींना करावे लागले आहेत. त्याशिवाय बँकांचे हप्ते, जीएसटी व अन्य कर, घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल, कामगारांचे पगार, तसेच आरटीपीसीआर तपासणीसाठी दर पंधरा दिवसांनी प्रति कामगार ५०० रुपये मोजावे लागतात. या सर्व गोष्टींनी व्यापाऱ्यांचे अक्षरशः कंबरडेच मोडले आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठीच काही व्यापाऱ्यांनी किराणा माल व मेडिकलप्रमाणे त्यांनाही ‘काऊंटर सेल’ची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. एखाद्या मॉलला जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली परवानगी देण्यापेक्षा छोट्या व्यावसायिकांना ‘काऊंटर सेल’ पद्धतीने काही दिवसांनी परवानगी देण्यास हरकत नसावी. कारण मॉलमध्ये प्रत्येक वस्तू ग्राहकच हाताळत असतो. त्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुळात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे या छोट्या व्यावसायिकांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनानेदेखील व्यापारी व व्यावसायिकांना समजून घ्यायला हवे. व्यापारी नियमांचे पालन करण्यास किंवा प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहेत. अशावेळी प्रशासनानेही नियमांच्या आधारे अरेरावी न करता सलोख्याचे नाते जपायला हवे. तसे पाहिले, तर अजून काही दिवसांचा प्रश्न आहे. अर्थात ३० एप्रिलपर्यंत काही गोष्टी सहन कराव्या लागतील. तोपर्यंत काहीशी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एकूणच अंतिम टप्प्यात ही लढाई येऊन पोहोचली आहे. तेव्हा ‘हत्ती गेला शेपूट उरले’ असे म्हणायला हरकत नाही. जनतेनेही अजून थोडे दिवस कळ सोसून लॉकडाऊनचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच पोलिसांनी पण जनतेमध्ये सहकार्याच्या भावनेतून लॉकडाऊनबाबत योग्य ती काळजी घेऊन कोरोना नष्ट होण्यासाठी सहकार्य करावे, ही अपेक्षा आहे.

Web Title: The elephant went and the tail remained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.