वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 21:50 IST2019-10-08T21:50:18+5:302019-10-08T21:50:23+5:30
वीज अंगावर पडून १२ वर्षांचा एक मुलगा मृत्युमुखी पडला.

वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
देवरुख : वीज अंगावर पडून १२ वर्षांचा एक मुलगा मृत्युमुखी पडला. हृदयाला चटका लावणारी ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास देवरुखनजीकच्या नांदळज बौद्धवाडी येथे घडली. सुशांत विश्वास कांबळे असे त्याचे नाव आहे. सुशांत ताम्हाणे शाळेचा सातवीतील विद्यार्थी होता. तो घराच्या पडवीत बसलेला असताना वीज पडली आणि ही दुर्घटना घडली.
संगमेश्वर तालुक्यात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह काही गावात पाऊस चांगलाच कोसळला. नांदळज बौद्धवाडी येथील सुशांत हा सायंकाळी घराच्या पडवीत बसलेला होता. यावेळी आलेल्या विजेचा लोळ पडवीच्या दिशेने आला. यात सुशांत हा खाली कोसळला. सुशांतला तत्काळ त्याच्या नातेवाईकांनी देवरुख ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी सांगितले. घटनास्थळी जाऊन तलाठी गावित यांनी पंचनामा केला. सुशांतच्या जाण्याने ताम्हाने पंचक्रोशीवासीयांना चटका बसला आहे.