निवडणुकीचे फटाके चिपळुणात फुटले

By Admin | Updated: April 8, 2015 00:30 IST2015-04-07T22:39:31+5:302015-04-08T00:30:24+5:30

आवश्यक ती कागदपत्र सादर केली आणि एकूणच जिल्हा बँकेचा कारभार कसा बोगस आहे, हेही त्यांनी सांगितले

Election fireworks burst into pieces | निवडणुकीचे फटाके चिपळुणात फुटले

निवडणुकीचे फटाके चिपळुणात फुटले

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जिल्हा बँकेचे फटाके चिपळूणमध्ये फुटत असताना कदम यांनी आज (मंगळवारी) चोरगे यांच्यावर बेछूट आरोप केले. त्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. चिपळूण येथे उद्या (बुधवारी) राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निवडीसाठी बैठक होत आहे. तत्पूर्वीच माजी आमदार कदम यांनी चोरगे यांच्यापेक्षा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही संचालकांवर केला होता. अशा संचालकांना उमेदवारी देऊ नका, असेही कदम यांनी सुचवले होते. परंतु, हे आरोप चोरगे यांनी आपल्यावर घेऊन बचावात्मक पवित्रा घेतला. हा पवित्रा घेताना त्यांनी रमेश कदम यांच्या कर्ज प्रकरणावर प्रकाश टाकला आणि हे प्रकरण अधिक चिघळले. रमेश कदम यांच्यापेक्षा भास्कर जाधव बरे, असे चोरगे यांनी सांगतानाच रमेश कदम यांनी राष्ट्रवादी संपवली आता ते बँकेकडे वळले आहेत, असाही आरोप केला होता. चोरगे यांच्या या आरोपाने कदम दुखावले. चोरगे हे सह्याद्री शिक्षण संस्थेत साधे प्राध्यापक म्हणून नोकरीला आले. गोविंदराव निकम यांचा हात धरुन ते राजकारणात व सहकारी बँकेत आले. चोरगे यांची शैक्षणिक संस्था, त्यांच्या जमिनी, बंगला या साऱ्यावर कदम यांनी प्रकाश टाकला. हा सारा करिष्मा कसा झाला, याचा खुलासा चोरगे यांनी करावा, असे आव्हान कदम यांनी दिले. बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत अनेक आरोप कदम यांनी केले आहेत. अगदी विद्यार्थी, कर्मचाऱ्यांपासून बोगस जमीन खरेदी व बचत गटांना दिलेल्या कर्जातून सबसिडी लाटली, ही सारी प्रकरणे कदम यांनी विस्तृतपणे मांडली. आवश्यक ती कागदपत्र सादर केली आणि एकूणच जिल्हा बँकेचा कारभार कसा बोगस आहे, हेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेतील पॅनल राष्ट्रवादीचे आहे, हे कदम मानायला तयार नाहीत. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कदम यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध एवढ्या टोकाची भूमिका घेताना एका दिवसात हा निर्णय घेतला असावा, असे वाटत नाही. कदम यांनी सादर केलेली कागदपत्र आणि याद्या पाहिल्या तर ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ...’ अशी स्थिती आहे.
बँकेतीलच काही असंतुष्ट संचालक कदम यांना ढाल करुन ही लढाई लढत असावेत, अशी चर्चा आता राष्ट्रवादीत सुरू झाली आहे. कदम यांचा बोलविता धनी राष्ट्रवादीतीलच कोणी असावा, हे आता उघड होत आहे. चोरगे यांच्या मागे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव खंबीरपणे आहेत. जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरी त्यांचा पाठिंबा चोरगे यांनाच असावा, असे सध्यातरी दिसत आहे. सद्यस्थितीत कदम-चोरगे असा संघर्ष वरकरणी दिसत असला तरी यामागे फार मोठे राजकारण सुरु असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. ही निवडणूक सध्या अडचणीत असलेल्या राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरते की काय? अशी स्थिती आहे. (प्रतिनिधी)...


रमेश कदम यांनी साधले चेअरमन तानाजी चोरगे यांच्यावर शरसंधान.
राष्ट्रवादीअंतर्गत मतभेद चव्हाट्यावर.
रमेश कदम यांचा बोलवता धनी कोणी वेगळाच असण्याची शक्यता.
निवडणुकीच्या माध्यमातून चोरगे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न.
सीआयडी चौकशीत पालवण, सावर्डे बँकेच्या शाखा रडारवर.

Web Title: Election fireworks burst into pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.