शिक्षण विभाग अंधारात

By Admin | Updated: July 31, 2014 23:22 IST2014-07-31T22:50:16+5:302014-07-31T23:22:41+5:30

जिल्हा परिषद : वीजपुरवठा तोडल्याने काळोखात काम करण्याची वेळ

Education Department in the dark | शिक्षण विभाग अंधारात

शिक्षण विभाग अंधारात

रत्नागिरी : तीन महिन्यांचे २८ हजार रुपयांचे विजेचे बिल थकल्याने जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला. त्यामुळे कर्मचारी आंधारात काम करीत आहेत.
परिषद भवनाच्या आवारामध्ये लायब्ररी इमारत म्हणून नोंद असलेल्या दुमजली इमारतीमध्ये माध्यमिक शिक्षण विभाग, जलस्वराज विभाग आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांची कार्यालये आहेत. माध्यमिक विभागामध्ये जिल्हाभरातून शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि इतर लोकांची सतत वर्दळ असते.
वीजबिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याची मोहीमच महावितरणने हाती घेतली आहे.त्यातून शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांची कार्यालयेही सुटलेली नाहीत. दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरी पंचायत समितीचा वीज पुरवठा तोडण्यात आला होता. मात्र, वीजबिल भरल्यानंतर दुसऱ्या दिवशीच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. ही मोहीम शालेय पातळीवर राबवण्यात आल्यानंतर आता महावितरणने आता वक्रदृष्टी माध्यमिक शिक्षण विभागाकडे वळवली आहे. शिक्षण विभागावरही कारवाई केली असून त्यामुळे या विभागाचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाच्या इमारतीचे मार्चनंतरचे तीन महिन्यांचे वीजबिल भरलेले नाही. तीन महिन्यांचे वीजबिल २८ हजार २१० एवढे आहे. ते भरण्याबाबत महावितरणकडून जिल्हा परिषदेला वेळोवेळी सूचना देण्यात आली होती. मात्र, हे वीजबिल भरण्याची मुदत संपल्यानंतर अखेर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लायब्ररी इमारतीचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे काल सायंकाळपासून माध्यमिक शिक्षण विभाग, जलस्वराज विभाग आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना हे तिन्ही विभाग आंधारात आहेत.पावसाळ्याचे दिवस असल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांना आंधारात चाचपडत काम करावे लागत आहे. त्यातच पावसाळा असल्याने वीजेची गरज असताना त्याचवेळी हा पुरवठा तोडण्यात आल्याने काम करायचे कसे? असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागासमोर उपस्थित झाला आहे. (शहर वार्ताहर)
मार्च महिन्यानंतर शिक्षण संचालक कार्यालयाकडून आकस्मिक निधी आलेला नाही. त्यामुळे वीजबिल भरणा करण्यासाठी आपल्या विभागाकडे इतर कोणताही निधी नसल्याने वीजबिल थकीत आहे.
- आर. एस. अहिरे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

Web Title: Education Department in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.