आर्थिक गैरव्यवहार; शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करावा
By Admin | Updated: June 11, 2014 00:43 IST2014-06-11T00:41:28+5:302014-06-11T00:43:12+5:30
कुमार शेट्ये यांची पत्रकारपरिषदेत मागणी

आर्थिक गैरव्यवहार; शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करावा
रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरीमधील उपविभाग क्र. १ चे शाखा अभियंता जनक हरिदास धोत्रेकर यांनी गेल्या दोन वर्षांच्या काळात मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी करुन गुन्हा दाखल करावा व कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे पत्र आपण शहर पोलीस निरीक्षकांना दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मारुती मंदिर येथील भाड्याच्या जागेत असलेल्या कार्यालयाची दुरुस्ती व देखभाल स्वत: घरमालकाने करावयाची असते. परंतु शाखा अभियंता धोत्रेकर यांनी ३१ मार्च २०१२ रोजी धनादेश क्र. ५७४७०० द्वारे रुपये ८२५६ संतोष धनावडे यांना दिलेला आहे. हे काम १५ मार्च २०१२ ते २८ मार्च २०१३ या कालावधीत केले आहे. याबाबत लाचलुचपतच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाने ७ मार्च २०१४ ला पाठविलेल्या पत्रानुसार या कार्यालयाचे असे कोणतेही काम झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे काम निविदा न काढता केलेले आहे. याबाबत विभागीय लेखा अधिकारी व कार्यकारी अभियंता यांंनी कामाची देयके अदा करण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा खात्याचा दाखला घेणे जरुरीचे होते. तो घेतलेला नाही. धोत्रेकर यांनी अनेक इमारतींची कामे करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून निविदा काढून मार्च २०१३ मध्ये अनेक कार्यारंभ आदेश ठेकेदारांना दिलेले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)