प्रवासासाठी तसेच माॅलमध्ये प्रवेशासाठी लागणार ई-पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:40+5:302021-08-22T04:34:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गुहागर : लाॅकडाऊनचे निर्बंध आता शासनाने शिथील केले आहेत. मात्र, तरीही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध ...

प्रवासासाठी तसेच माॅलमध्ये प्रवेशासाठी लागणार ई-पास
लाेकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : लाॅकडाऊनचे निर्बंध आता शासनाने शिथील केले आहेत. मात्र, तरीही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार आता रेल्वे, हवाई प्रवास करण्यासाठी तसेच माॅलमध्ये प्रवेशासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास सादर करावा लागणार आहे.
https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक त्यासाठी तयार करण्यात आली आहे. या लिंकच्या सहाय्याने मोबाईलवर एका क्लीकवर घरबसल्या हा ई-पास उपलब्ध होणार आहे.
असा मिळवा ई-पास
१. पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
२. त्यातील ट्रॅव्हल पास फाॅर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स यावर क्लिक करा.
३. त्यानंतर आपला काेविड लसीकरणासाठी नाेंदवलेला माेबाईल क्रमांक नमूद करावा. लगेचच माेबाईलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस)द्वारे प्राप्त हाेईल.
४. हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकांचे नाव, माेबाईल क्रमांक, लाभधारकांचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपाेआप समोर दिसतील.
५. त्यामध्ये पास निर्माण करा (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
६. त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच काेविड लसीचा पहिला आणि दुसरा डाेस घेतल्याची दिनांक इत्यादी सर्व तपशील आपाेआप दिसेल.
७. या तपशीलामध्ये सेल्फ इमेज या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वत:चे छायाचित्र अपलाेड करावे. ते माेबाईल गॅलरीतून अपलाेड करता येऊ शकते किंवा माेबाईल कॅमेराद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलाेड करता येईल.
८. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पत्रकारिता लघुसंदेश (एसएमएस)द्वारे लिंक प्राप्त हाेईल.
९. लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास माेबाईलमध्ये जतन (सेव्ह) करुन ठेवावा.
१०. प्रवास करताना किंवा माॅलमध्ये प्रवेश करताना दोन्ही डोस घेतल्याचा पुरावा म्हणून हा ई-पास सहजगत्या दाखवता येणार आहे.
शासनाच्या आदेशानुसार दोन डोस घेतलेल्यांनाच युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास मिळणार आहे. जिल्ह्यात सध्या दुसरा डोस न घेतलेल्यांसाठी प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा आता वेगाने ही मोहीम राबवत आहे. अधिकाधिक लोकांना लसीचा दुसरा डोस मिळावा, त्याचबरोबर ज्यांना एकही डोस मिळालेला नाही, त्यांनाही लस उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
- डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी