जिल्ह्यात सुरू होणार ई-लर्निंगचे नवे पर्व सुरु...

By Admin | Updated: June 28, 2014 00:31 IST2014-06-28T00:24:56+5:302014-06-28T00:31:39+5:30

राजेंद्र अहिरे : पाचवी ते दहावीच्या वर्गांकरिता आॅडिओ-व्हिडीओ सॉफ्टवेअर

E-learning begins in district ... | जिल्ह्यात सुरू होणार ई-लर्निंगचे नवे पर्व सुरु...

जिल्ह्यात सुरू होणार ई-लर्निंगचे नवे पर्व सुरु...

रत्नागिरी : शासनाने सिंधुदुर्गसह अन्य काही जिल्ह्यात राबविलेला ई-लर्निंग फंडा आता रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्याची जय्यत तयारी झाली आहे. पाचवी ते दहावीच्या सर्व पुस्तकांवर आधारित अभ्यासाचे धडे व त्याव्यतिरिक्त अभ्यास असलेले साफ्टवेअर येत्या महिनाभरात जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये उपलब्ध होणार आहे. संगणक कार्यशाळेत आॅडिओ - व्हिडिओद्वारे अभ्यासक्रमातील धडे विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र अहिरे यांनी पत्रकारांना दिली.
राज्यात सिंधुदुर्ग, सातारा, धुळे, कोल्हापूर, सांगली व अन्य जिल्ह्यातही गेल्या वर्षीपासूनच हा ई- लर्निंग प्रकल्प सुरू करण्यात आला असून, त्याचा मुलांना चांगला फायदा झाला आहे. आता हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातही राबविला जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरकरिता निविदा काढण्यात आली असून, या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन मंडळाने १ कोटी ३४ लाख रूपये मंजूरही केले आहेत. या निविदा आॅनलाइन असून, आतापर्यंत वेबसाइटवर ४ निविदा दिसून येत आहेत.
मात्र, त्या उघडलेल्या नाहीत. येत्या ३० जून रोजी या निविदा उघडल्या जाणार आहेत. त्यानंतर चांगल्या दर्जाचे सॉफ्टवेअर पुरविणाऱ्या व स्पर्धात्मक किंमत देणाऱ्याची निविदा स्वीकारली जाणार आहे.
पाचवी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील क्रमिक पुस्तकांवर आधारित हे सॉफ्टवेअर शाळांमधील संगणकाच्या हार्ड डिस्कवर घेतले जाईल. त्यानंतर त्या-त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार संगणक कक्षात बोलावून त्या विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे देतील. अन्य जिल्ह्यात हा प्रकल्प यशस्वी झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही आता याचा लाभ घेता येईल.
या सॉफ्टवेअरमुळे शिक्षकांचे महत्व कमी होणार नाही. उलट आॅडिओ-व्हिडिओद्वारे अभ्यासातील महत्वाचा भाग समजावून सांगितल्याने विद्यार्थ्यांच्या तो अधिक लक्षात राहिल, असे अहिरे म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: E-learning begins in district ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.