दोघा महिलांमुळे मुलीवर होणारा अत्याचार टळला
By Admin | Updated: August 27, 2014 23:24 IST2014-08-27T22:28:38+5:302014-08-27T23:24:55+5:30
साखळोली गावात दोन दिवसांपासून दबक्या आवाजात याबाबत चर्चा चालू

दोघा महिलांमुळे मुलीवर होणारा अत्याचार टळला
दापोली : चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरापासून लांब नेत तिच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या एका २२ वर्षीय तरूणाला गावातील दोन सतर्क महिलांनी दटावल्याने त्याचा हेतू सफल झाला नाही. त्यानंतर तरूणाने तेथून पळ काढल्याने अल्पवयीन मुलीवर होणारा अत्याचार टळला आहे. साखळोली गावात दोन दिवसांपासून दबक्या आवाजात याबाबत चर्चा चालू झाली आहे. त्यासाठी वाडीची बैठक होऊन तीन दिवस उलटून गेले तरी यावर तोडगा निघू शकला नाही. मात्र, दापोली पोलीस स्थानकात तक्रार देण्यास त्या अल्पवयीन मुलीचे पालक घाबरत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. रविवारी दुपारच्या सुमारास याच गावातील एक २२ वर्षीय तरूण एका नऊ वर्षाच्या मुलीला वाडीजवळील असणाऱ्या भातशेतीमध्ये घेऊन गेला व तिच्याशी लगट करु लागला. हा प्रकार काही काळ गवतामध्ये चालूच होता. जवळच असणाऱ्या भातशेतामध्ये दोन महिला बेणणीचे काम करत होत्या. त्यांना संशयास्पद हलणारे गवत दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्याच वाडीतील एक तरूण आपल्या नऊ वर्षीय चुलत बहिणीबरोबर अश्लील वर्तन करताना दिसला. दोन्ही महिलांनी त्याला दटावत आरडाओरडा करायला सुरुवात केली. शेवटी घाबरुन या लंपट तरूणाने तेथून पळ काढला. तो थेट गावाबाहेरच निघून गेला. शेवटी त्या दोन महिलांनी तेथे रडत असलेल्या त्या अल्पवयीन मुलीला तिच्या घरी नेऊन सोडले व पाहिलेला प्रकार त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना सांगितला. याचवेळी त्या तरूणाची शोधाशोध गावात सुरु झाली. पण, तो कोठेही आढळून आला नाही. सायंकाळी वाडीची बैठकही बोलावण्यात आली. मात्र, त्या बैठकीत सदरचा तरूण हजर राहिला नाही.दुसऱ्या दिवशी सकाळीच तो लंपट तरूण गावामध्ये हजर झाल्यावर वाडीतील लोकांनी पुन्हा बैठक बोलावली. या बैठकीत दोन्ही मुलांचे पालक हजर होते. बैठकीतील लोकांनी सदरचा गंभीर विषय पालकांवरच सोडला असून, याबाबत आतापर्यंत दापोली पोलीस स्थानकात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. (प्रतिनिधी)