ट्रक अपघातामुळे महामार्ग सहा तास ठप्प
By Admin | Updated: December 1, 2015 00:16 IST2015-11-30T23:26:10+5:302015-12-01T00:16:32+5:30
रविवारी मध्यरात्रीची घटना : वेरळ घाटात ट्रक उलटून टेम्पोला धडकला

ट्रक अपघातामुळे महामार्ग सहा तास ठप्प
लांजा : गोव्याहून मुंबईकडे मासळी घेऊन जाणारा ट्रक वेरळ घाटातील ‘यू’ आकाराच्या वळणावर ट्रक उलटला आणि त्याची समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोला धडक बसली. रविवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्यामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल सहा तास खोळंबली होती. हा ट्रक बाजूला करण्यासाठी रत्नागिरीतून के्रन मागविण्यात आली. के्रनच्या साहाय्याने ट्रक बाजूला केल्यानंतर सकाळी ६ वाजता वाहतूक सुरळीत झाली.
किसन सखाराम चव्हाण (वय ४२, रा. एमआयडीसी, तळोजा) गोवा येथून मासळी भरलेला ट्रक (एमएच-०८-डब्ल्यू-८१६५) घेऊन मुंबईकडे जाण्यासाठी रविवारी निघाले. रात्री १२.४५ वाजण्याच्या दरम्यान वेरळ घाट उतरत असताना एका वळणावर ट्रक उलटला. याच दरम्यान सिद्धेश शंकर भोडे (३०, रा. अंबस, खेड) हा आयशर टेम्पोतून वेफर्स घेऊन चिपळूणकडून गोव्याकडे जात होता.
ट्रक उलटत असताना त्याची आयशर टेम्पोला धडक बसल्याने दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताची वर्दी लगेचच लांजा पोलिसांना देण्यात आली. या अपघातानंतर लांजा येथील हवालदार प्रकाश पांगरीकर, वाहतूक पोलीस संतोष झापडेकर, कॉन्स्टेबल नंदकुमार सावंत, चालक सतीश साळवी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यास पहाटेचे सहा वाजले. तोपर्यंत दोन्ही बाजूंना वाहनांची रांग लागली होती. (प्रतिनिधी)