रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडूननिधी उपलब्ध करून दिला जातो. पण गेले अनेक महिने मागणी प्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतनाची अपुरी रक्कम देण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अवघे ५६ टक्के वेतन देण्यात आले आहे. त्यातच एसटी बँकेला ४० कोटी रुपये इतकी रक्कम द्यावी लागल्यामुळे प्रशासन अडचणीत सापडले आहे.राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून दर महिन्याला सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येत आहे. मात्र ती कधीच पूर्ण येत नसल्याने पूर्ण वेतन देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच पी.एफ., ग्रॅजुटी, बँक कर्ज, एल.आय. सी, अशी ही साधारण ३५०० कोटी रुपयांची देणी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होऊन सुद्धा त्या-त्या संस्थांकडे वर्ग करण्यात आलेली नाहीत. कर्मचाऱ्यांची व महामंडळाची एकूण थकीत देणी रक्कम ही सात हजार कोटी रुपयांच्यावर गेली आहेत.मार्च महिन्याच्या वेतनासाठी व इतर थकीत देणी दर यासाठी शासनाकडे ९२५ कोटी रुपये इतका निधी मागण्यात आला होता. पण प्रत्यक्षात २७२ कोटी ९६ लाख रुपये एवढाच निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातील ४० कोटी रुपये कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड रक्कम एसटी बँकेकडे भरावी लागली. राज्यातील ८७ हजार एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यासाठी ४६० कोटी रुपये इतकी रक्कम लागते. मात्र अपुरा निधी प्राप्त झाल्याने ५६ टक्के इतकेच वेतन एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.अॅप्रेंटस वेतन, निवृत्त अधिकारी वेतन १०० टक्के अदा करण्यात आले आहे. मात्र नियमित कर्मचाऱ्यांचे ५६ टक्के तर सुरक्षा रक्षकाचे ५० टक्के वेतन देण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेनेसुध्दा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारकडून निधी कमी आला, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापला; वेतन रखडल्याने नाराजी
By मेहरून नाकाडे | Updated: April 9, 2025 18:39 IST