मोहोरामुळे आंबा बागायतदारांना दिलासा
By Admin | Updated: December 29, 2015 00:48 IST2015-12-28T23:21:47+5:302015-12-29T00:48:16+5:30
थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे हंगाम लांबणार

मोहोरामुळे आंबा बागायतदारांना दिलासा
रत्नागिरी : डिसेंबर संपता संपता हवामानात बदल झाला आहे. पारा चांगलाच खाली आला असून, कडाक्याची थंडी पडू लागली आहे. पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्यास सुरूवात झाली आहे. एकूणच यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे हंगाम लांबणार हे निश्चित आहे. परंतु या थंडीमुळे बागायतदार मात्र सुखावले आहेत.
कडक पालवी झालेल्या झाडांना मोहोर प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, हे प्रमाण अल्प आहे. आतापर्यंत जेमतेम ४० टक्के झाडांना मोहोर आला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडी सुरु झाली, तर येणाऱ्या मोहोरानंतर आंबा मार्चअखेर बाजारात येतो. परंतु आता डिसेंबर संपत आला तरी किरकोळ मोहोर झाल्याने बागायतदार चिंतेत आहेत. आंब्याचा पहिला मोहोर हा चांगले व मोठे फळ देणारा मानला जातो. परंतु यावर्षी मोहोरच कमी असल्यामुळे पिकाचे प्रमाण अत्यल्प असू शकते. मोहोर व्यवस्थित आला नसल्यामुळे फळधारणा लांबण्याची शक्यता आहे. आलेल्या मोहोराला किरकोळ फळधारणा आहे. कणीपासून बोरांच्या आकाराएवढी फळे लागली आहेत. परंतु ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सातत्याने वातावरणात बदल होत असल्यामुळे मोहोर व फळांच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. कीटकनाशकांचे वाढते दर, मजुरी, इंधन, खर्च वाढत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक होत असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. जानेवारी जवळ आला तरी व्यवस्थित मोहोर न झाल्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. परंतु थंडी सुरू झाल्यामुळे बागायतदार सुखावला आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकरी स्वत:च्या कलमांबरोबरच इतर शेतकऱ्यांची कलमे कराराने घेऊन आंबा व्यवसाय करीत असतात. त्यामुळे कराराने कलमे घेतल्यानंतर ठरलेले पैसे द्यावे लागतात. परंतु उत्पन्नच गेली दोन वर्षे अल्प आल्याने संबंधित शेतकरीवर्गाला आर्थिक भुर्दंड बसला आहे. यावर्षी उशिरा थंडी सुरू झाली आहे.
थंडीच्या कडाक्यामुळे झाडावर ताण येणार आहे. त्यामुळे मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. थंडीचा कडाका कायम राहिला तर मात्र मोहोर चांगला होईल. उशिरा का होईना आंबा उत्पादन येईल, यामुळे शेतकरी सुखावले आहेत. (प्रतिनिधी)
ेएक हजार दराने हापूसची विक्री
रत्नागिरी बाजारात कैरी विक्रीला आली आहे. कर्नाटकातून कैरी विक्रीसाठी रत्नागिरीला येत आहे. ७० रुपये किलो दराने कैरीची विक्री सुरू आहे. शिवाय रत्नागिरी हापूसही विक्रीला आला आहे. एक हजार रुपये डझन दराने हापूसची विक्री सुरू आहे. पावसाळ्यात मोहोर आलेल्या झाडांना झालेल्या फळधारणेतून तयार झालेला आंबा विक्रीस उपलब्ध आहे. आज बाजारात तीन डझन आंबा विक्रीस उपलब्ध होता.