दिल्लीच्या नेत्यामुळेच युती तुटली
By Admin | Updated: October 4, 2014 23:52 IST2014-10-04T23:52:06+5:302014-10-04T23:52:06+5:30
संजय राऊत : युती तोडणाऱ्यांना निवडणुकीनंतर राज्यात भांडी घासायला लावणार

दिल्लीच्या नेत्यामुळेच युती तुटली
रत्नागिरी : राज्यात गेल्या २५ वर्षांपासून असलेली युती तोडण्याचे स्वप्न घेऊन दिल्लीतून एक नेता अफझलखानी विडा घेऊन महाराष्ट्रात आला होता. त्यांने युती तोडली व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनेचा विश्वासघात केला, असा घणाघाती आरोप करतानाच भाजपाने युती का तोडली, कोणासाठी तोडली हे आता स्पष्ट करावे, असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिले व युती तोडणाऱ्यांना निवडणूकीनंतर राज्यातच भांडी घासायला लावू असा इशाराही दिला.
रत्नागिरीत प्रचारसभेनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणूकपूर्व युती तुटली असली तरी निवडणूकीनंतर युती होऊ शकते असे वक्तव्य भाजपाचे नेते करीत आहेत याबाबत ते म्हणाले, जे म्हणत आहेत, त्यांना त्यांच्या पराभवाचा अंदाज आलेला आहे. इतके वितंडवाद झाल्यानंतर व पाठीत खंजीर खुपसल्यानंतर निवडणूकीनंतर युती करू म्हणणाऱ्यांच्या बुध्दीची किव करावीशी वाटते. मात्र ज्यांनी युती तोडण्याचे काम केले त्यांना निवडणूकीनंतर आम्ही राज्यात भांडी घासायला लावू, अशा शब्दात राऊत यांनी आपला राग व्यक्त केला.
युती टिकावी म्हणून सेनेतफे खुप प्रयत्न केले गेले. युतीत फाटाफूट झाली परंतु राजकीय नेते त्याला हवे तसे रंग फासत आहेत. आम्हाला फाटाफूट नको होती मात्र आता त्याचे खापर आमच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र युती तोडणारेच आता हादरले आहेत. राज्यात फक्त सेनेचेच राज्य येईल. केंद्रातील आघाडीतून बाहेर पडण्यास सेनेने नकार का दिला, असे विचारता राऊत म्हणाले, केंद्रातील आघाडीचे संस्थापक सदस्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रकाशसिंग बादल आदी होते. आघाडीत त्यावेळी ३२ पक्ष होते. पाचवर्षांपूर्वी त्यातील तीन पक्ष लोकशाही आघाडीत उरले. नंतर त्यातून नितीशकुमारही बाहेर पडले. भाजपा व शिवसेना हे दोनच पक्ष उरले. शेवटपर्यंत आम्ही युतीशी निष्ठावान असताना केंद्रसरकारमधून बाहेर पडणे मान्य नाही. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र तोडण्यासाठीच भाजपाने युती तोडली
महाराष्ट्र राज्य तोडण्यासाठीच भाजपाने युती तोडली, असा आरोप करीत त्यांना विदर्भ महाराष्ट्रातून वेगळा करायचा आहे. राज्य तोडायचे हेच त्यांचे स्वप्न आहे. मात्र राज्याची छकले करण्यास, राज्य तोडण्यास शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळेच युती तोडली गेली. मात्र राज्यातील जनता महाराष्ट्र तोडण्याचे हे भाजपाचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, मुंबईतून महाराष्ट्राची सत्ता चालेल, दिल्लीतून नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
सामंत आल्यामुळे कोणी नाराज नाहीत
उदय सामंत यांना राष्ट्रवादीतून शिवसेनेत घेण्यामागे चांगला उद्देश आहे. गेल्या दहा वर्षात आमदार व मंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. रत्नागिरीला एक चांगला चेहरा मिळाला आहे. त्यामुळे पक्षात अजिबात नाराजी नाही तर उत्साह आहे. सामंत यांना पक्षात घेण्याआधी पक्षप्रमुख ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नंतरच सामंतना प्रवेश दिल्याचे राऊत म्हणाले. उदय बने नाराज आहेत, असे विचारता त्याबाबत माहिती घेऊन चर्चा करू असे ते म्हणाले.