दिवाळीवर महागाईचे सावट

By Admin | Updated: October 17, 2014 22:58 IST2014-10-17T21:11:28+5:302014-10-17T22:58:25+5:30

साहित्य महागल्याने सर्वसामान्यांचे दिवाळीला मात्र दिवाळे निघताना दिसत आहे.

Due to the inflation in Diwali, | दिवाळीवर महागाईचे सावट

दिवाळीवर महागाईचे सावट

कुवे : कोकणचा सर्वाधिक मोठा असलेला दिवाळी सण जवळ आला असल्याने या सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. यासाठी लागणारे साहित्य महागल्याने सर्वसामान्यांचे दिवाळीला मात्र दिवाळे निघताना दिसत आहे.
सध्या सर्वच क्षेत्रात महागाई वाढली आहे. त्यातच या दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तंूनी बाजारपेठा सजल्या आहेत. विविध आकर्षक आकाशकंदिल, लहान मुलांच्या बंदुका, कॅपा, रोल आदी फटाक्यांच्या माळांचे बाजारपेठामध्ये ठिकठिकाणी स्टॉल्स उभे राहिले आहेत. या सणामध्ये लागणारे सुगंधी उटणे, अत्तर आदी वस्तंूच्याही किमती वाढल्या आहेत.
दिवाळी सणासाठी लागणाऱ्या फराळाच्या तयारीला गृहिणीवर्ग लागला आहे. मात्र, खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीमुळे हा फराळ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यातच तयार फराळ घ्यायचा झाला तर बाजारपेठेत त्याच्या किमती वाढल्या आहेत. या वस्तू खरेदी करताना ग्राहकवर्गाच्या तोेंडचे पाणी पळत आहे. यामध्ये साखर ३२ रुपये किलो, पातळ पोळे ३० रुपये किलो, गोडेतेल १०० ते १५० रुपये लीटर, खोबरे २०० रुपये किलो, रवा ३० रुपये किलो, डालडा ९० रुपये असे दर आहेत. त्यामुळे या वाढत्या महागाईत दिवाळीचे खाद्य पदार्थ तयार करणे आता सर्वसामान्य ग्राहकवर्गाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. तयार करंज्या ३५० रुपये किलो, चिवडा १८० रुपये किलो, लाडू १६० रुपये किलो, चकली २५० रुपये किलो, तिखट शेव २०० रुपये किलो असे तयार फराळांचे दर असल्याने तयार फराळ घेणे सर्वसामान्यांना कठीण आहे.सध्या वाढत्या महागाईमध्ये आता बचत गटांनी मात्र एकत्र येऊन या दिवाळीच्या फराळाच्या वस्तू तयार करुन बाजारपेठेमध्ये विक्रीस उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे त्यांना यामधून आर्थिक हातभार लागणार आहे. या दिवाळीसाठी सर्वत्र लहान मुलांनी किल्ले सजावटीला सुरुवात केली आहे. या किल्ल्यांवर मावळे लावणे, ते सजवणे आदीसह किल्ला सजावट स्पर्धांची क्रेझही या सणामध्ये वाढली असल्याने बच्चे कंपनीमध्ये या सणाचा उत्साह अधिक दिसत आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे हा सण सर्वसामान्यवर्गाला महाग झाला असून, या सणात लागणाऱ्या वस्तू खरेदी करताना सर्वसामान्य ग्राहकवर्गाला आपला खिसा गरम ठेवावा लागत आहे.
दिवाळीच्या सणात बरेच लोक सोन्याची खरेदी करतात. त्यासाठी व्यापारीवर्गही सज्ज झाला आहे. विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या अनेक दागिन्यांनी सुवर्ण पेढ्या सज्ज झाल्या आहेत. (वार्ताहर)

साखर३२ रुपये किलो
पातळ पोळे३० रुपये किलो
गोडेतेल१०० ते १५० रुपये लीटर
खोबरे२०० रुपये किलो
रवा३० रुपये किलो
डालडा९० रुपये
करंज्या३५० रुपये किलो
चिवडा१८० रुपये किलो
लाडू१६० रुपये किलो
चकली२५० रुपये किलो
तिखट शेव२०० रुपये किलो

आकाशकंदिल, पणत्या व फटाक्यानी बाजारपेठा सजल्या.
वाढत्या महागाईमुळे दिवाळी साजरी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर.
रेडिमेड फराळ महागला.
दिवाळीत बचत गटाना मिळाला आर्थिक हातभार.
दिवाळी सणात सर्वसामान्याच्या खिशाला चाट.
दिवाळी जाणार महागाईत तरीही वस्तुंची खरेदी जलदगतीने...

Web Title: Due to the inflation in Diwali,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.