गणेश चतुर्थीमुळे शहरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:15+5:302021-09-11T04:32:15+5:30
रत्नागिरी : भाविकांच्या लाडक्या बाप्पाचे शुक्रवारी जिल्ह्यात घरोघरी आगमन झाले आहे. गणेश चतुर्थीसाठी नोकरदार मंडळी घरी गेल्याने शहरात ...

गणेश चतुर्थीमुळे शहरात शुकशुकाट
रत्नागिरी : भाविकांच्या लाडक्या बाप्पाचे शुक्रवारी जिल्ह्यात घरोघरी आगमन झाले आहे. गणेश चतुर्थीसाठी नोकरदार मंडळी घरी गेल्याने शहरात सकाळपासूून शुकशुकाट होता. काही पेट्रोलपंप, औषधाची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद असल्यामुळे बाजारपेठेत शांतता होती. मात्र, सायंकाळनंतर काही दुकाने उघडल्यानंतर तुरळक वर्दळ सुरू हाेती.
गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचे सावट उत्सवावर आहे. गणेश चतुर्थीला बहुतांश मंडळी गावाकडे जात असल्याने दुकाने, पानाच्या, चहाच्या टपऱ्याही बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे साधा चहासुध्दा उपलब्ध होत नव्हता. वृत्तपत्रांचे स्टॉल मात्र सुरू होते. दिवसभर केवळ गणेशमूर्ती नेणारी वाहने व भक्तांचीच ये-जा सुरू होती. अन्य किरकोळ वाहने रस्त्यावर फिरताना दिसत हाेती. बहुतांश व्यावसायिकांनी सायंकाळी दुकाने उघडली हाेती. मिठाईची दुकाने, फळे व फुले विक्रेत्यांकडे तुरळक गर्दी दिसत हाेती.
भाज्यांना मागणी
शनिवारी बहुतांश महिला ऋषी पंचमीचे व्रत करतात. यादिवशी जनावरांच्या श्रमाचे अन्न टाळले जाते. केवळ मानवी श्रमाने उगविलेल्या भाज्या, धान्याचाच आहारात समावेश केला जातो. ऋषी पंचमीसाठी मिश्रभाज्या शिजविल्या जात असल्याने पालेभाज्या, फळभाज्या, तसेच वरीचे तांदूळ यांना मागणी होती. पालेभाज्यांची जुडी २५ ते ३० रुपये, तर फळभाज्यांमध्ये दोडके, पडवळ, लाल भोपळा, दुधी भोपळा यांना मागणी होती. २० ते २५ रुपये नग या दराने विक्री सुरू करण्यात आली, मात्र तरीही खरेदी सुरू होती.