पुराच्या धसक्याने चिपळुणातील चाकरमान्यांचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST2021-09-12T04:36:22+5:302021-09-12T04:36:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/ चिपळूण : गतवर्षी कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्वे मार्गावर तब्बल ...

पुराच्या धसक्याने चिपळुणातील चाकरमान्यांचे प्रमाण घटले
लाेकमत न्यूज नेटवर्क
संदीप बांद्रे/ चिपळूण : गतवर्षी कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्वे मार्गावर तब्बल २२४ गणेशोत्सव विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच एस. टी. बसही जादा सोडण्यात आल्या आहेत. या सर्वच गाड्यांचे बुकिंग फुल्ल होते. चिपळुणात आतापर्यंत १६ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत; मात्र चिपळुणात पुराच्या धसक्याने अनेकांनी गणेशोत्सवाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत चाकरमान्यांची संख्या कमीच आहे.
चिपळुणात १६,५०० घरगुती तर १५ सार्वजनिक गणेशमूर्ती स्थानापन्न झाल्या आहेत. काेराेनामुळे सार्वजनिक गणपतींपैकी ५ गणपतींचे प्रथमच दीड दिवसाने विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाला चाकरमानी कोकणात एक दिवस का होईना हजेरी लावतो. गतवर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे फार चाकरमानी गावी आले नाहीत; मात्र यावर्षी काहीशी परिस्थिती नियंत्रणात असल्याने व रेल्वे आणि बस सेवा सुरु आहेत. कोकणात येणारी प्रत्येक गाडी हाऊसफुल्ल आहे, परंतु चिपळूणच्या बाबतीत काहीशी वेगळी परिस्थिती आहे.
चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुरात अतोनात नुकसान झाले. अजूनही येथील परिस्थिती स्थिर झालेली नाही. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुराचा धसका घेत अनेक चाकरमान्यांनी चिपळुणात येणे टाळल्याचे पुढे येत आहे. आतापर्यंत ७५ एस. टी. बस व खासगी वाहनांतून सुमारे १६ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. आतापर्यंत अन्य बस स्थानकातून ४०० बस फेऱ्या येथील आगारात दाखल झाल्या असून, अजूनही गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ सुरुच आहे. त्यामुळे सध्या रेल्वे स्टेशनसह बस स्थानकात आलेल्या चाकरमान्यांची लगबग पाहायला मिळत असली तरी ही संख्याही कमीच आहे.
----------------------
मुंबई, पुण्यातील ६० टक्के चाकरमान्यांचे लसीकरण
कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि प्रशासनाने केले आहे. सुरुवातीला प्रशासनाने दोन डोस न घेतलेल्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. मात्र, चाकरमान्यांच्या तोबा गर्दीमुळे ती शक्य नसल्याने ती चाचणी रॅपिडवर आणण्यात आली; मात्र तेही शक्य नसल्याने चाकरमान्यांची नोंदणी त्या त्या रेल्वेस्थानकांवर, बसस्थानकांवर करण्यात येत आहे. त्यानुसार ६० टक्के चाकरमान्यांनी दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली.