बंद मंडल कार्यालयामुळे ग्रामस्थ हैराण
By Admin | Updated: October 24, 2015 00:54 IST2015-10-23T21:33:38+5:302015-10-24T00:54:13+5:30
खेड तालुका : लवेलमधील प्रकाराने ग्रामस्थांमध्ये नाराजी

बंद मंडल कार्यालयामुळे ग्रामस्थ हैराण
आवाशी : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी लवेल (ता. खेड) येथील तलाठी व मंडल कार्यालय कोणतीही सूचना प्रसिद्ध न करताच बंद ठेवल्याने लोकांची गैरसोय झाली.शनिवारी अर्ध्या दिवसानंतर रविवारी शासकीय कार्यालयांना पूर्ण दिवस सुटी असते. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी कार्यालयीन कामकाज पूर्ववत करण्यासाठी त्या त्या कार्यालयाच्या संबंधितांनी हजर राहणे गरजेचे असते. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून तलाठी, मंडल, तहसील, जिल्हा कार्यालयापर्यंत शासकीय कामे करण्यासाठी ग्रामस्थ त्या त्या कार्यालयातून जात असतात. मात्र, लवेल येथील तलाठी व मंडल कार्यालय सोमवार, दि. १९ रोजी सकाळी १२.३० वाजेपर्यंत उघडलेच नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली.कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या सूचना फलकांवर तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे दिवस व फिरतीचे दिवस लिहिण्यात आले आहेत. मात्र, सोमवारी कार्यालय बंद राहणार आहे, अशी सूचना कुठेही दिसली नाही. येथे उपस्थित असलेले हरिश्चंद्र घाग, महेंद्र आंब्रे (आवाशी), शौकत घारे (असगणी), यशवंत अमरे (लवेल), चंद्रकांत म्हादलेकर (दाभिळ) यापैकी काहींनी तलाठ्यांना दूरध्वनी केला असता शासकीय प्रशिक्षणासाठी जिल्हा कार्यालयात गेले असल्याचे सांगण्यात आले.
कोतवाल म्हणून काम पाहणाऱ्या वाडेकर यांचा दूरध्वनीही बंद होता. त्यामुळे आज सोमवारी सुटी आहे की, कार्यालय बंदच राहणार आहे. याबाबत लोकांना काही समजायला मार्ग नव्हता. मात्र, उशिराने मिळालेल्या माहितीनुसार वाडेकर दुपारनंतर कार्यालयात आल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)
सुटीचा दिवसवगळता आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सरकारी कार्यालय बंद असू नये, असे धोरण आहे. या दिवशी अधिकारी भेटत असल्याने ग्रामस्थ कार्यालयात कामासाठी येतात. मात्र, खेड तालुक्यातील लवेल येथील मंडल कार्यालय बंद ठेवल्याने गैरसोय झाली.