पावसाच्या थैमानामुळे खेडमध्ये वीज खंडित
By Admin | Updated: June 17, 2014 01:16 IST2014-06-17T01:05:44+5:302014-06-17T01:16:12+5:30
खेड शहर व परिसरात तुफानी पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

पावसाच्या थैमानामुळे खेडमध्ये वीज खंडित
खेड : खेड शहर व परिसरात तुफानी पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे संपूर्ण तालुक्यात अंधाराचे साम्राज्य माजले होते. सुमारे सव्वा तास पाऊस बरसला. या पावसाने महावितरणची बत्ती गुल केली.
खेड तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे परतीच्या मार्गावर आलेल्यांची त्रेधा उडाली. खेड बाजारपेठेत पावसाचा फटका व्यापाऱ्यांना बसलाा. पावसामुळे ग्राहकांची गर्दीही कमी झाली होती़ या पावसामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. या पावसामुळे भातशेतीमध्येही पाणी घुसले. शेतीच्या संरक्षणार्त बांधण्यात आलेल्या गढ्यांचे नुकसान झाले. पेरणीसाठी शेताच्या बांधावर ठेवण्यात ्आलेले नांगर पहिल्या पावसातच पाण्याखाली गेले.
गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरू करण्यासाठी खडतर परिश्रम घ्यावे लागले. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटून खाली पडल्या आहेत.
तालुक्यात अनेक ठिकाणी पहिल्या पावसाने वीज प्रवाहात व्यत्यय आला. पाऊस थांबल्यानंतर पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कालांतराने पूर्ववत करण्यात यश आल्याचे आज संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
उशिरा सुरू झालेल्या पावसाने खेडवासिय त्रस्त झाले. पहिल्या पावसात वीज मंडळाची बत्ती गेल्याने पावसाळा संपेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. (प्रतिनिधी)