पावसाअभावी यंदा माशांचा पाळणा लांबण्याची भीती!
By Admin | Updated: July 8, 2014 00:19 IST2014-07-07T23:50:28+5:302014-07-08T00:19:22+5:30
मच्छीमारांनाही फटका

पावसाअभावी यंदा माशांचा पाळणा लांबण्याची भीती!
मेहरुन नाकाडे : रत्नागिरी, पावसाने पाठ फिरवल्याने केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर मच्छिमारांनाही मोठा फटका बसण्याची भीती आहे. पाऊस कमी झाल्याने यंदा पावसाळ्यातही तापमान वाढले आहे. त्यामुळे मच्छीच्या प्रजननासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. पाऊस उशिराने सुरू झाल्याने हा काळ लांबण्याची शक्यता आहे आणि जर पाऊस कमी झाला तर मत्स्य प्रजननच खूप कमी प्रमाणात होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
यंदा उशिराने सुरू झालेल्या पावसाचा परिणाम शेतीवर झाला आहेच, पण त्याचबरोबर मत्स्योत्पादनावरही त्याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. पावसाळा हा माशांचा प्रजननाचा हंगाम असतो. त्यामुळे नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरू होते. जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांत समुद्राच्या पाण्याचे तापमान बदलते. यावेळी पृष्ठभागावरचे थंड पाणी तळाशी जाते व तळातील उष्ण पाणी वरती येते. याचदरम्यान माशांसाठी पोषक द्रव्ये पृष्ठभागावर येतात. माशांच्या पिलांसाठी प्लवंग (खाद्य) तयार होतं. पावसाळ्यातील थंडगार वारे, पावसाचे तुषार, जोरदार येणाऱ्या लाटा हे वातावरण माशांच्या प्रजननासाठी पोषक ठरतं. परंतु पाऊस नसल्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून उष्णता वाढली आहे. समुद्री भागात तर ही उष्णता जास्तच आहे. उष्णतेमुळे समुद्राच्या पृष्ठभागावरही गरम पाणी असतं, रात्रीच्या वेळी तापमान खाली आल्यावर पाणी थंड होतं. त्यामुळे माशांच्या प्रजननकाळासाठी पोषक वातावरण अजूनही निर्माण झालेले नाही.
किनारपट्टीवरील कांदळवन, खाजण भागात मासे अंडी घालतात. नदीनाल्याच्या पाण्यातून वाहत येणारे क्षारयुक्त पाणी माशांसाठी खाद्य तयार होते. मात्र, पाऊस जोरदार पडत नसल्यामुळे माशांना व पिलांना आवश्यक ते खाद्य उपलब्ध होत नाही. याचा परिणाम माशांच्या प्रजननावर होणार आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे. पाऊस उशिरा झाला, तर प्रजननाचा काळ लांबण्याची शक्यता आहे.
नदीपात्रातील पाणीदेखील अद्याप कमी आहे. नदीच्या पात्रातही हीच प्रक्रिया होते. पावसाचे तुषार झेलण्यासाठी मासे उथळपात्रात येतात. मात्र, उष्णतेमुळे पाण्याच्या तापमानात वाढ होते. सध्या माशांमध्ये अंडी तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. उष्ण तापमानामुळे माशांची अंडी नष्ट होण्याची शक्यता आहे. किंबहुना नदीपात्रातील मासे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.