पावसाअभावी पुराचा धोका टळला
By Admin | Updated: November 1, 2015 22:55 IST2015-11-01T22:55:32+5:302015-11-01T22:55:32+5:30
राजापूरची पूर समस्या : पुराची टांगती तलवार कायम; गाळाचा प्रश्न ‘जैसे थे’

पावसाअभावी पुराचा धोका टळला
राजापूर : सरत्या पावसाळ्यात नेहमीपेक्षा कमी पाऊस पडल्याने यावर्षी एकदाही पुराचे पाणी शहरात भरले नाही. तरीही भविष्यातील पुराची टांगती तलवार काही दूर झालेली नाही. त्यामुळे नदीपात्रातील गाळाचा उपसा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजापूरकरांवरील पुराचे संकट कायम आहे. त्यामुळे आगामी काळात तरी शहरातील गाळ उपश्याचे अर्धवट राहिलेले काम मार्गी लागेल का हाच खरा सवाल आहे.
मागील अनेक वर्षे राजापूर शहराला पुराच्या विळख्याचा त्रास सहन करावा लागत असून, दरवर्षी पावसाळ्यातून किमान चार ते पाचवेळा राजापूरवासियांना या अग्नीदिव्यातून जावे लागते. त्याचा परिणाम हा संपूर्ण शहराच्या जनजीवनावर होतो. सन १९८२ व सन १९९७मध्ये सर्वात मोठा पुराचा फटका या शहराला बसला होता. त्यामुळे पावसाळा सुरु झाला की, राजापूरच्या नदीकाठावरील समस्त नागरिक व व्यापारी यांना रात्रन्रात्र जागून काढावी लागते. मागील अनेक वर्षात या पुराने राजापूरवासियांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन राजापूरचे तत्कालीन आमदार गणपत कदम यांनी याबाबत सातत्याने आवाज उठवत शासनाकडे पाठपुरावा सुरुच ठेवला होता व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनाने कोदवली व अर्जुना या दोन नद्यांतील गाळ उपशाला सुरूवात करण्यात आली. त्यासाठी शासनाने सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. हे काम शासनाकडून कोल्हापूरच्या जलसंपदा अभियांत्रिकी विभाग, तिलारी यांनी देण्यात आले. तिलारी विभाग स्वत:कडील यंत्रसामुग्री वापरणार असल्याने शासनाला केवळ इंधनाचा खर्च द्यावा लागणार होता. त्यानुसार नियोजित कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले व एकूण १ लाख ९८ हजार ७७२ घनमीटर एवढा उपसा करण्याचे ठरले. २००९ साली प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. त्यावेळी केवळ ६५हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. मात्र, पुढील तीन वर्षात कामात थोडी गती आली व जवळपास ९८हजार घनमीटर गाळाचा उपसा झाला. त्यासाठी ४१ लाख ६१ हजार १४३ एवढा खर्च झाला होता. अजून एक लाख घनमीटर गाळाचा उपसा बाकी होता. या कालावधीत उपसलेला गाळ नद्यांच्या दुतर्फा डंपिंग करुन ठेवण्यात आला. मात्र, त्यानंतर आलेल्या पुराच्या पाण्यात बराचसा गाळ पुन्हा नदीपात्रात सामावला. त्यानंतर मागील पाच ते सहा वर्षात गाळ उपशाच्या कामाला सुरूवात झालेली नाही.
शहरातील पुराला कारणीभूत ठरणाऱ्या दोन नदीपात्रांतील गाळाचा उपसा करण्यात आल्यानंतर शहरात घुसणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. यापूर्वी ज्या वेगाने पुराचे पाणी शहरात घुसायचे तेवढी गती नंतर राहिली नाही. त्यामुळे शासनाने राहिलेल्या गाळाचा उपसा तत्काळ केल्यास राजापूरकरांवरील पुराचे संकट कायमचे दूर होईल. (प्रतिनिधी)
पुराची समस्या : शहराच्या जनजीवनावर परिणाम
राजापूर शहरातील पुराची समस्या कायम आहे. सन १९८२ आणि १९९७ मध्ये शहरात सर्वात मोठा पूर आला होता. या पुराचा फटका शहरातील व्यापाऱ्यांना अनेकवेळा बसला आहे. खर्ली पात्रातून हे पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत येऊन शहराला पुराचा विळखा बसतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते.