उपरच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेलाच
By Admin | Updated: December 24, 2015 00:34 IST2015-12-24T00:12:30+5:302015-12-24T00:34:08+5:30
मच्छिमारीवर गंभीर परिणाम : जोर कमी होण्याची प्रतीक्षा; खराब वातावरणामुळे नौका बंदरात उभ्या

उपरच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेलाच
देवगड : देवगड तालुक्यात दुसऱ्या दिवशीही उपरच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून, या वातावरणामुळे मच्छिमारी व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. वाऱ्याचा जोर कमी झाल्यानंतरच समुद्रातील मच्छिमारी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.उपरच्या वाऱ्यामुळे सध्या समुद्र खवळला आहे. या खराब वातावरणामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या नौकाही बंदरात परत येत आहेत. दरवर्षीप्रमाणे यात्रा सुरू झाल्यावर उपरचा वारा जोरात वाहू लागतो. मात्र, वातावरण निवळल्यावर मच्छिमारांना मासळी चांगल्या प्रमाणात मिळते, असा मच्छिमारांचा अनुभव आहे. नारळी पौर्णिमेनंतर काही नौकामालकांनी आपल्या नौका समुद्रात लोटल्या. परंतु, वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे समुद्रातील वातावरणही बिघडले व पर्यायाने या वातावरणाचा परिणाम मच्छिमारी व्यवसायावर झाला.मच्छिमारी व्यवसाय करणाऱ्या मोठ्या नौकाधारकांना कर्मचाऱ्यांचा पगार तसेच जेवणखाणे यांचा खर्च मोठा असल्याने व मासळीचे प्रमाण कमी झाल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. समुद्रातील वातावरणातही वारंवार होत असलेल्या बदलाचा मच्छिमारीवर परिणाम होत असून, या वातावरणामुळे नौका मच्छिमारीसाठी न पाठवता बंदरातच उभ्या करून ठेवाव्या लागत आहेत.खाडीमध्येही पारंपरिक मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांना मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने हा व्यवसायही संकटात आहे. खाडीत मिळणारे मुळे, तिसरे यांचे प्रमाणही कमी झाल्याने मच्छिमारीलाच पूरक असणारे हे छोटे व्यवसायही सध्या बंद आहेत. (प्रतिनिधी)
दरवर्षीप्रमाणे यात्रा सुरू झाल्यावर वारा जोरात.
अचानक झालेल्या बदलामुळे वातावरणातही बदल.
मच्छिमारांना मासळी मिळण्याचे प्रमाण कमी.
छोटे व्यवसायही सध्या बंद आहेत.