मद्याची वाहतूक करणारा अटकेत
By Admin | Updated: December 7, 2015 00:17 IST2015-12-06T23:06:58+5:302015-12-07T00:17:03+5:30
राज्य उत्पादन शुल्कची मोहीम : राजापूर तालुक्यातील ओणी येथे पथकाची कारवाई

मद्याची वाहतूक करणारा अटकेत
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करताना पिकअप गाडीसह १५ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, रत्नागिरीने जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमाराला राजापूर तालुक्यातील ओणी येथे केली. याप्रकरणी पिकअप चालकाला अटक करण्यात आली. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी पहाटेपासून मुंबई - गोवा महामार्गावर गस्त घालत असताना राजापूर तालुक्यातील ओणी गावच्या हद्दीमध्ये पिकअप (एमएच-०७ पी-२१८६) ही गोव्याहून येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरीला मिळाली होती.
पिकअप गाडी चालकाकडे याबाबत चौकशी केली असता त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. यामुळे राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना त्याचा संशय आला. वाहनावरील ताडपत्री बाजूला करून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याने भरलेले एकूण १७२ बॉक्स आढळून आले.
याबाबत वाहनचालक महमद रखांगी (२४, रा. बांदा, ता. सावंतवाडी) याला अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह, पिकअप गाडी मिळून एकूण १५ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय तवसाळकर, दीपक वायंगणकर, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, शामराव पाटील, अतुल पाटील, महेश शेवडे, शंकर जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय हातीसकर, सुनील चिले, राजेंद्र शेट्ये तसेच जवान सुरेश शेगर, विशाल विचारे, अनुराग बर्वे, राजेंद्र भालेकर, वैभव सोनावले, मलीक धोत्रे, चक्रपाणी दहीफळे, निनाद सुर्वे, शेख, वड, मिलिंद माळी, जगन चव्हाण, दत्तप्रसाद कालेलकर तसेच महिला जवान अनिता डोंगरे व मयुरी चव्हाण यांच्या पथकाने केली. (वार्ताहर)
नाताळ सण व ३१ डिसेंबरनिमित्त गोवा बनावटीचे विदेशी मद्य मोठ्या प्रमाणावर मुंबई - गोवा महामार्गावरून वाहतूक होत असते. ही वाहतूक रोखण्यासाठी बांदा ते कशेळी घाट या दरम्याने राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची विशेष पाच पथके तैनात करण्यात आली आहेत.
- संतोष झगडे,
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी