मालकाच्या गाडीवर ड्रायव्हरची ऐश
By Admin | Updated: June 5, 2015 00:15 IST2015-06-04T23:13:15+5:302015-06-05T00:15:20+5:30
रत्नागिरीत कारवाई : सातारा पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

मालकाच्या गाडीवर ड्रायव्हरची ऐश
सातारा : गाडीतून मालक लघुशंकेसाठी उतरला असता ड्रायव्हरने गाडी चोरून नेली. मालकाची लाखोंची रक्कमही गाडीतच. या रकमेतून ड्रायव्हर रत्नागिरीत ऐशारामात राहू लागला. पण अखेर पोलिसांचे हात त्याच्यापर्यंत पोहोचलेच. मालकाची कार आणि त्याच्या पैशातून ड्रायव्हरने खरेदी केलेल्या महागड्या वस्तूंसमवेत सातारा पोलिसांनी त्याला अटक केली.
दि. १५ एप्रिल रोजी कोल्हापूरचे कपड्यांचे व्यापारी राकेश जयरामदास बसनतानी (वय ४०, रा. गांधीनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) त्यांच्या गाडीतून (एमएच ०९ डीए २८१९) सातारा येथे आले होते. सातारा व अन्य ठिकाणाहून केलेली व्यापारातील वसुलीची सहा लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम कारमध्ये घेऊन ते कोल्हापूरकडे निघाले होते. गोडोलीजवळ ते लघुशंकेसाठी थांबले असता त्यांचा ड्रायव्हर अनिस शेख (रा. रुकडी, कोल्हापूर) हा त्यांना न सांगता रोख रकमेसह कार घेऊन परागंदा झाला होता. बसनतानी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
अनिस शेख हा चोरलेल्या पैशांतून गृहोपयोगी वस्तू, दागदागिने, मोटारसायकल खरेदी करून रत्नागिरीत मौजमजा करीत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. मुठाणे यांनी तातडीने उपनिरीक्षक आर. के. कसबेकर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेतील जवानांना बोलावून सूचना केल्या आणि रत्नागिरीस जाऊन अनिसला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. कसबेकर आणि कर्मचाऱ्यांनी रत्नागिरीत जाऊन सापळा रचला आणि अनिसलाल ताब्यात घेतले. त्याच्याकडून मालकाची चोरलेली कार तसेच एक लाख ५३ हजारांच्या गृहोपयोगी वस्तू, मोटारसायकल, दागदागिने, एलसीडी, सोफासेट, फ्रिज, व विमानाची तिकिटेही जप्त केली.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या कामगिरीबद्दल पोलिसांच्या टीमचे कौतुक केले. (प्रतिनिधी)